Thursday, December 26, 2024
Homeविशेष लेखमहिला विशेष"ती " कायमची अनलॉक केव्हा होणार ??

“ती ” कायमची अनलॉक केव्हा होणार ??

   

     समान वेतन, समान काम , कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार यांसारख्या अनेक प्रश्नांना घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांनी जो लढा उभारला… जो संघर्ष केला… त्या संघर्षाचं प्रतीक म्हणून आज आपण 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करतो. महिलांच्या सत्कार समारंभाचे मोठ मोठे कार्यक्रम दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र घेतले जातात. स्त्री आता कशी स्वतंत्र आहे ?.. ती कशी तिला हवं ते करू शकत आहे वगैरे वगैरे ची भाषणे या या कार्यक्रमांमधून होतात. त्यातच हल्ली भर म्हणून सोशल मीडियावर स्टेटस वगैरे ठेवणं… महिला दिनाच्या शुभेच्छा असा फॉर्मॅलिटी पुरता मेसेज टाकून मोकळे होण एवढ्यापुरताच महिला दिन आता पुरून उरला आहे.भाषण आणि मोठमोठ्या गप्पांच्या पुढे जाऊन स्त्री स्वातंत्र्य आहे ही सांगायची नाही तर कृती करण्याचीदेखील गोष्ट आहे याचा विसर पडत चालला आहे असं नव्हे तर जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करण्यारी व्यवस्था उभी राहते आहे.

   गेल्या वर्षभरात कोरोनाच्या या महाभयंकर साथीच्या लाटेने सारे जग थांबवलं… हातावर पोट असणाऱ्या रोज कष्ट करून पोट भरणाऱ्या लोकांचं जणू आयुष्यच थांबल्यासारख झालं होतं . उपासमारीने ,भुकेने अनेकांचे मृत्यू झाले… कामाच्या शोधात आपली गाव सोडून शहराकडे आलेले कामगार हजारो किलोमीटरची पायपिट  करून आपलं घर गाठण्यासाठी निघाली होती.कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी करून टाकली… हाताला काम नसल्याने रोज कष्ट करून जगणाऱ्यांच जगणं मुश्कील होऊन गेलं तर दुसरीकडे अनेकांच वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याने कोरोना पूर्वीही जी स्त्री कायमचीच उंबऱ्याच्या आणि चार भिंतींच्या आत लॉकडाऊनमध्ये होती तिची संकट मात्र वाढली… तिचं चार तासांच काम आता आठ तासांच झालं होत..कोरोनाची लाट तीचं कष्ट थांबवू शकली नाही.. मुळात आपल्याकडे घरातील झाडून काढण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंतच्या कामांना आपण क्षुल्लक समजतो.. जी स्त्री तुमचे कपडे ,भांडी धुते… तुम्हाला चांगलं पौष्टिक अन्न बनवून खाऊ घालते… घरदार स्वच्छ ठेवून तुमच आरोग्य सांभाळते… तिच्या कष्टांना आपण कवडीमोल समजतो.. तू काय करते?? काय काम असतं तुला घरात ?? हे किती सहजपणे आपण बोलून जातो. घरातील काम करण्याची जबाबदारी स्त्रियांइतकीच पुरुषांचीही असते अशी शिकवण मुळात आपल्याकडे दिलीच जात नाही… 

  कोरोना अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन आता लसीकरणाचा दुसरा- तिसरा टप्पा सुरू झालाय…परंतु जाती – धर्माच्या ज्या बंधनात स्त्री गेल्या अनेक वर्षांपासून लॉकडाऊनमध्ये आहे , तिच्या अनलॉकची प्रक्रिया कधी गती घेणार ? जुन्या रुढी, परंपरा यातून तिला बाहेर काढण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्याची आज गरज आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेली आमची उच्चशिक्षित  स्त्री… नवऱ्यासाठी उपास – तपास करण्यात , त्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाच्या कडेने फिरण्यात बिझी आहे . या सगळ्या रुढी , परंपरा ,उत्सव साजरा करण्यामागे मुळात कारणे काय आहेत ? आता या सगळ्यांची आवश्यकता आहे का ?  आपण स्वतः ला यात किती गुंतवून ठेवायचं याचा विचार ती करायला तयार नाही ( अपवाद वगळता )…

    स्त्री शिक्षणाचा पाया ज्या सावित्रीमाय  – जोतिबांनी घातला… सामाजिक क्रांतीच्या या लढ्यात ज्योतिबांच्या बरोबरीने आमची सावित्री माय ही बाहेर पडली… अगदी ज्योतिबाच्या खांद्याला खांदा देऊन … त्या सावित्रीला समजून घेण्यापेक्षा यमाकडे आपल्या नवऱ्याचा जीव मागण्यासाठी गेलेल्या तथाकथित सावित्रीचा वसा  घेऊन आमची स्त्री चालत आहे. स्त्रीचं शिक्षण आणि जडण घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. म्हणून ती कितीही शिकली , उच्चशिक्षित झाली, नोकरी करू लागली तरी चुकीच्या आणि वाईट प्रथा , परंपरांच्या विरोधात ती बंड करून उठत नाही ( याला अपवाद आहेत पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे ) . पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिला जे दुय्यमत्व लादल गेलं आहे , ते समजून घेण्यास ती स्वतः ला सक्षम बनवीत नाही.. लग्नानंतर मोठ्या हौसेने गळ्यात मंगळसूत्र , पायात जोडावे आणि सिंधूर लावणाऱ्या मुलींना हे सगळं करायचं का ? हा  साधा प्रश्नही पडत नाही आणि पडलाच तर त्याची उत्तरं तिला मिळू नयेत अशी व्यवस्थाही आपल्याकडे करून ठेवली आहे… सौभाग्याचं प्रतीक म्हणून जे दागिने अंगभर घालून आपण फिरतो..  सौभाग्याची तीच प्रतीक पुरुषांच्या अंगावर का दिसत नाहीत ? हा साधा प्रश्न विचारण्याची हिम्मत देखील आमच्या स्त्रीमध्ये का नाही… असणार तरी कशी ? ज्या व्यवस्थेत मुळात प्रश्न विचारणं हाच मोठा गुन्हा समजला जातो… अशा व्यवस्थेत अगदी रुढी – परंपरांच्या विरोधात आणि धर्माच्या विरोधात एका स्त्रीने प्रश्न केलेला कसा चालेल ?…

     एकविसाव्या शतकात आता मुलगा – मुलगी भेदभाव कोणी करत नाही… आता दोघेही समान आहेत मग कोरोनाच्या या महाभयंकर साथीच्या काळात मुलींच्या विवाहांच्या संख्येत वाढ झाली ती का ?  या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडून मिळतील काय ? जेव्हा जेव्हा देशावर किंवा  एखाद्या कुटुंबावर आर्थिक संकट येत , तेव्हा तेव्हा त्याचा दुष्परिणाम स्त्रियांवर सर्वात प्रथम  सुरू होतो. कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीच्या गरजा , तिची निकड यांना तिच्या प्रमाणेच दुय्यम स्थान असते…

         सगळ बदलत चाललं आहे … असं म्हणणाऱ्या स्त्री आणि पुरुष दोघानाही मला विचारावस वाटत की, एवढंच सगळ बदलत चाललं आहे तर या सगळ्या जुन्या प्रथा ,परंपरा ज्यांना धड बुड ना शेंडा … त्या मुळासकट उपटून टाकण्यासाठी तुमचे हात का धजावत नाहीत ? का आजही मासिक पाळी सारख्या पवित्र क्रियेला अपवित्र समजून त्या स्त्रीला अस्पृश्याची वागणूक दिली जाते. स्त्रियांना या काळात आराम भेटावा म्हणून तिला वेगळं ठेवलं जातं वगेरे सांगणारे लोक अनेक आहेत.  मग घरात पाण्याला , स्वयंपाकाला हात लावू नको , देव घराकडे जाऊ नको .. या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या जातात ? तिचं कष्टचं जर कमी करायचं असेल तर मासिक पाळीच्या काळात करा तुम्ही चार दिवस घरात धूनी – भांडी … बिघडत कुठ ? खुप मोठ्या प्रमाणात आज मुली शिकत आहेत . पण त्या नंतर मुलांना नोकरी मिळावी म्हणून जेवढे प्रयत्न केले जातत… तेवढे प्रयत्न मुलींसाठी होतात का हो ? लग्नासाठी आजकाल शिकलेली मुलगी पाहिजे अशी मागणी वाढल्यामुळे लग्नपत्रिकेवर लावण्यापुरतीच तिची डिग्री आता उरली आहे (यालाही अपवाद नक्कीच )…नोकरी करू पाहणाऱ्या , आपली स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या कित्येक मुलींना लग्नानंतर आपल्या इच्छेविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागतात… लग्नाचा अर्थ देखील समजत नसताना तिला लग्नाच्या मांडवात उभ केल जात… 

     समाजात आजही विधवा स्त्रियांना कार्यक्रम आणि समारंभात स्थान दिलं जातं नाही…तिला हवं तस आणि मुक्त ती जगत असेल तर तिच्या चारित्र्या वरतीच प्रश्न उभा केला जातो… उलटपक्षी पुरुषांच्या बाजूने अस नसत … बायकोला मुल होत नाही म्हणून जेवढ्या सहजपणे पुरुष दुसर लग्न करतो…तेवढ्याच सहजपणे आपला नवरा आपल्याला मुल देऊ शकत नाही म्हणून स्त्री दुसर लग्न करू शकते का हो? …कारण गर्भ न रहण्यामागे प्रत्येकवेळी स्त्रिमध्येच दोष असतो असे नाही… बदलत चाललेल्या या जगात आजही स्त्री जेव्हा शहराच्या चौकात किंवा गावाच्या वेशीवर एकटी उभी असते तेव्हा आजही तीला आपण सुरक्षित आहोत असं वाटतं नाही … ही अतिशय वाईट गोष्ट आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नजरा आजही तिला वरखाली न्याहाळत असतात…

       सगळ बदलत चाललय हे खर पण या बदलत्या जगात स्त्री स्वतंत्र असल्याचा फक्त भास निर्माण केला जातोय …इथल्या पुरुषी व्यवस्थेन आपल्याला हवं तेवढच स्वातंत्र्य तिला देऊन अघोषित अशा बंधनात तिला अडकवून ठेवलं आहे. ही बंधन मोडीत काढण्यासाठीची जी चळवळ महात्मा फुले – शाहू महाराज – डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक समाजसुधारकानी सुरू केली… त्या चळवळीला अधिक प्रकर्षाने आज भक्कम करण्याची गरज आहे… परिवर्तनाच्या या वाटेवर चालणारे असे अनेकजण आज आहेत की, जे सगळी बंधन  आणि विरोधांना जुगारून सगळ्याच प्रकारचा भेदभाव विरहित असा समाज निर्माण करण्यासाठी स्वतः पासून , आपल्या कुटुंबापासून परिवर्तनाची सुरुवात करीत आहेत. ही आशेची बाब आहे. परंतु त्याच प्रमाण आज खुप कमी आहे… आणि अशा लोकांच्या पाठीशी थांबणारेही संख्येने खुप कमी आहेत.. या संख्येत प्रत्येक वर्षी वाढ करण्याचा संकल्प आपण महिला दिनाच्या दिवशी करायला हवा….म्हणून या महिला दिनाच्या दिवशी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा  सत्कार समारंभ तर कराच परंतु पुरुषांप्रमाणेच स्त्री पण एक माणूस आहे … म्हणून घरात आणि समाजात वावरत असताना तिच्याशी सन्मानाने आणि आदराने वागा…तिच्या अडचणी ..तिचे प्रश्न पुरुषांपेक्षा थोडे वेगळे आहेत…तिच्याशी खुले पणाने मैत्री करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा…जेणेकरून स्त्री आणि पुरुष यामधील नात अधिक भक्कम होण्यास मदत होईल…म्हणून या महिला दिनाच्या दिवशी हा दिवस फक्त महिलांचा आहे अस न म्हणता… आजचा दिवस स्त्री आणि पुरुष समानतेचा दिवस आहे म्हणून स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन हा साजरा करूयात हाच खरा महिला दिन असेल…अस मला वाटत.

– पुजा कांबळे, सोलापूर

(लेखिका स्री प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

संबंधित लेख

लोकप्रिय