Friday, December 27, 2024
Homeराज्यकोल्हापूर : हर्षल जाधव आणि विनायक होगाडे यांना 'विवेक जागर साथी पुरस्कार'

कोल्हापूर : हर्षल जाधव आणि विनायक होगाडे यांना ‘विवेक जागर साथी पुरस्कार’

कोल्हापूर : विवेक जागर मंचच्या वतीने चिरंतनी स्वाती कृष्णात हिच्या वाढदिवसानिमित्त दिले जाणारे ‘विवेक जागर साथी पुरस्कार’ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती राधानगरी शाखेचे कार्यकर्ते हर्षल रामचंद्र जाधव आणि राष्ट्र सेवा दल आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती इचलकरंजी चे कार्यकर्ते विनायक होगाडे यांना जाहीर झाला आहे. 

मानवताकेंद्री समाज उभारण्याकरिता संवैधानिक मुल्यांची कास धरून परिवर्तनवादी चळवळीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जनमानसांत रुजाविण्याकरिता काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पुरस्कार विजेत्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रदान केला जातो. 

हर्षल जाधव हे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर हुंबेवाडा(ता. राधानगरी) या दुर्गम शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया कार्यवाह या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जोडीदाराची विवेकी निवड, अंधश्रद्धा निर्मूलन चमत्कार सादरीकरण, संविधान आणि आपण, आपले महामानव, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, गांधी समजून घेताना या विषयांवर विविध ठिकाणी संवाद शाळा घेतल्या आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबवल्या जाणारे विसर्जित गणेश मूर्तीदान, होळी लहान करा-पोळी दान करा, फटाकेमुक्त दिवाळी, बुवाबाजी विरोधी संघर्ष, असे धर्मचिकित्सेचे उपक्रम निर्भयपणे राबवत असतानाच व्यसनमुक्ती अभियान, संविधान जागर, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वर्गणीदार करणे अशा कामांत आघाडीवर राहून संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच ते आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र कोल्हापूर च्या वतीने आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह घडवून आणण्यात सहभाग घेत असतात. 

विनायक होगाडे हे शालेय वयापासून राष्ट्र सेवा दलाचे सैनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजाखेर 20 हून अधिक शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यामध्ये केरळमधील शिबिरांचाही समावेश आहे. 2017 पासून ते राष्ट्र सेवा दल- निमंत्रित राज्य मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर ते महाराष्ट्र अंनिसमध्ये कार्यरत झाले. अंनिस लोकरंगमंचच्या रिंगण नाट्यात सहभागी होऊन नाटक, भारुड, गाणी यामाध्यमातून महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी 30 हून अधिक प्रयोग केले. 2016 ते 2019 या त्यांनी काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती- सोशल मीडिया विभाग, राज्यसहकार्यवाह म्हणून काम केले. डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल ऑगस्ट 2017 मध्ये सरकारला जाब विचारणारे ‘जवाब दो’ या ऑनलाईन कॅम्पेनची मुख्य जबाबदारी घेऊन यशस्वी केले. तसेच ते निळू फुले फिल्म सर्कल,इचलकरंजी सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. या माध्यमातून 50 हुन अधिक ठिकाणी शॉर्ट फिल्म्स दाखवून प्रबोधन कार्यात सहभाग घेतला आहे.  त्यांनी लिहिलेली ‘ओह माय गोडसे’ ही गांधीहत्येवरील कांदबरी तसेच “फिलिंग अस्वस्थ” नावाचा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. 

हर्षल जाधव यांना दिला जाणारा पुरस्कार रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ६ वाजता कसबा तारळे येथे प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. तर विनायक होगाडे यांना दिला जाणारा पुरस्कार रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ६ वाजता इचलकरंजी येथे डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. 

अशी माहिती विवेक जागर मंचाचे अध्यक्ष रमेश माणगावे, कार्याध्यक्ष सुनील स्वामी, सचिव स्वाती कृष्णात यांनी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय