मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधलीय. भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु झालं आहे. या हिंसाचारातील बळींचा आकडा ११ वर पोहोचलाय. या हिंसाचाराविरोधात भाजपकडून आज निदर्शनं करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र भाजपकडूनही आज राज्यभरात निदर्शन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही त्याबाबत माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये सुडाचे राजकारण चालू
चंद्रकांतदादा म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे’, असं आवाहन पाटील यांनी केलंय.
भाजपाध्यक्ष कोलकातामध्ये दाखल
दरम्यान, बंगाल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी कोलकाता इथं पोहोचले. हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करताना भाजप लोकशाही पद्धतीनेच तृणमूल काँग्रेसच्या अराजकतेचा सामना करेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हिंसाचाराचा निषेध व्यक्त केलाय. नड्डा मंगळवारी दुपारी कोलकाता इथं पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपचे केंद्रीय प्रभारी कैलास विजयवर्गीय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय सह प्रभारी शिवप्रकाश, माजी अध्यक्ष राहुल सिन्हा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉयसह राज्यातील अन्य नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर जे. पी. नड्डा भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले.