Friday, December 27, 2024
Homeजिल्हायात्रा, उरूस बंद, मनोरंजन आनंद नगरी शांत; व्यावसायिकांसह हजारो कुटुंबांची उपासमार सुरू

यात्रा, उरूस बंद, मनोरंजन आनंद नगरी शांत; व्यावसायिकांसह हजारो कुटुंबांची उपासमार सुरू

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कोरोना महामारी मूळे गेली दोन वर्षे पुणे जिल्ह्यातील पारंपरिक यात्रा, उत्सव, गाव जत्रा, धार्मिक कार्यक्रमावर शासनाने बंदी घातलेली  आहे.

त्यामुळे गावातील पारंपरिक मैदानावर पाळणे, खेळणी, मेरी गो राउंड, ड्रॅगन ट्रेन, ऑक्टोपस, जॉईंट व्हील, ब्रेक डान्स, मौत का कुआ, मिकी माउस, वॉटर बोट, सोलबो बस या द्वारे गावो गावी आणि पुणे, पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रात सर्वत्र आनंद नगरी उभी करणाऱ्या या सर्व व्यावसायिकांना उपासमार सहन करावी लागत आहे.

पुणे जिल्ह्यात अंदाजे 5 हजार छोट्या यात्रा आणि 800 मोठ्या यात्रा भरत होत्या. आनंदनगरीचे मेळे उभे करण्यासाठी यंत्र सामुग्री अतिशय अवजड असते. एका एका टीमची किमान 70 लाख भांडवल गुंतवणूक आहे. या व्यावसायिकांना शासन अधिकृत दर्जा नसल्यामुळे शेती गहाण ठेवून लाखो रुपयांची बँक, वित्तीय, सावकारी कर्जे डोक्यावर आहेत.

भोसरी येथील श्रावणी एंटरप्राइझेसचे व्यवस्थापक कानिफनाथ भुजबळ यांनी सांगितले की, पंढरपूर येथील वारी बरोबर आम्ही जात होतो, मुक्कामाच्या ठिकाणी मेळे लावत होतो. पावसाळा सोडला तर गावोगावी आणि पिंपरी चिंचवड शहरात आनंद मेळे भरवत होतो. आमच्या वाडवडिलांनी सुरू केलेला हा पारंपरिक व्यवसाय शिवकाळापासून सुप्रसिद्ध आहे. 

एका गाव जत्रेत तीन दिवसाचे 15 जणांच्या टीमला खर्च भागवून 40 हजार मिळायचे, आता आमची सर्व सामुग्री मोकळ्या मैदानात पडून आहे. आमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. महिला धुणी भांडी करत आहेत आणि आम्ही बिगारी काम करून जगत आहोत. सरकारने आम्हाला मेळे भरवण्याची परवानगी द्यावी अन्यथा सर्व सामुग्री भंगारात विकायची वेळ आलेली असल्याचेही भुजबळ म्हणाले.

हातावर पोट असणाऱ्या समाजाचे मनोरंजन, प्रबोधन करणाऱ्या अनेक कलाकारांवर  उपासमारीची वेळ आली आहे. बहुजन समाजातील या व्यावसायिकांकडे सरकारने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय