मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील दादर येथील “राजगृह” निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जातिअंत संघर्ष समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुंबई कमिटीने तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जागतिक मानवतावादी क्रांतिकारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह” निवासस्थानी केलेल्या हल्लाबाबतीत जातीअंत संघर्ष समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाने भीमराव आंबेडकर यांची भेट घेतली. यामध्ये कम्युनिस्ट नेते काॅम्रेड शैलेंद्र कांबळे, इंदूमिल राष्ट्रीय स्मारक प्रणेते चंद्रकांत भंडारे, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी वरिष्ठ पत्रकार दिपक पवार समावेश होता.
जातीअंत संघर्ष समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि डावी आघाडी आणि पुरोगामी पक्ष या प्रकरणात आपल्या सोबत असल्याचा विश्वास काॅम्रेड कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
जागतिक मानवतावादी क्रांतिकारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह” निवासस्थानी विकृत मानसिकतेतून हल्ला करण्यात आला. हा हल्ला करण्यामागे एक गंभीर कटकारस्थन व षडयंत्र आहे. जातीय तेड निर्माण करणे, वर्गीय हीत जपत राजकीय, जातीय, वर्गीय फायदा काही मुठभर सत्ताधारी भांडवलदारी उठवत आहेत. तसेच जनतेमधील सामाजिक एकोपा आणि मैत्रीपूर्ण वातावरण नष्ट होऊन अराजकता निर्माण करण्याचे कटकारस्थन ‘राजगृह’ झालेल्या हल्ल्यातुन दिसून येत, असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ हल्ला म्हणजे देशाच्या संसदेवर केलेला हल्ला आहे. या हल्लेखोरांंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आहोत, असे काॅम्रेड कांबळे यांनी सांगितले.