पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पवना, इंद्रायणी, मुळा नद्या प्रदूषणास जबाबदार कंपन्या व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज तसेच अखिल भारतीय गौरक्षा परिषदेच्या वतीने युवराज दाखले यांनी इमेल द्वारे केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. मावळात या उगम पावलेल्या नद्या शहरातच्या प्रवेशद्वारापर्यंत बर्यापैकी स्वच्छ निर्मळ असतात. मात्र, शहरात आल्यानंतर या पवित्र नद्यांचे अक्षरशः गटार बनवण्याचे पाप पिंपरी चिंचवड शहरातील राज्यकर्ते, प्रशासन व बेजबदार उद्योजक यांनी मिळून केले आहे. पवना नदी केजुबाई बंधारा ते चिंचवडगाव पर्यंत या पावसाळ्यापासून रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळणे, नदीतील मासे मरणे हे प्रकार पाच वेळा घडले आहेत.
किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडी अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून सुमारे २५ किलोमीटर वाहते. तसेच इंद्रायणी नदी देखील पिंपरी चिंचवड शहरातून वाहते. या नद्यांमध्ये अनेक उद्योगांचे त्यांच्या रासायनयुक्त पाणी, अनेक सोसायटी आपारमेंट नागरी वस्तीतून मैलामिश्रित पाणी सोडून वर्षानुवर्ष नद्या प्रदूषित केल्या जातात. या नद्यांमध्ये अनेक बांधकाम व्यवसायिक राडाराडा भरून नदीपात्र लहान करुन या जागेवरती प्लॉटिंग करून या जागा गोरगरीब नागरिकांना विकतात.
नदीपात्रात दरवर्षी जलपर्णी पूर्ण वाढून दिली जाते, मग कोट्यावधीचे टेंडर काढले जाते कागदाला कागद जोडून कोट्यवधीची बिले संगणमत करून काढले जातात. मात्र, जलपर्णी ठेकेदाराला पूर्णपणे कधीच साफ होत नाही. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहिली जाते. आणि करदात्या नागरिकांचे पैसे सर्वेक्षण लाटले जातात.
प्रशासनाने एसी कार्यालयातून बाहेर पडून शहरातील संपूर्ण नद्यांचे, नाल्यांचे सर्वेक्षण करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231107-WA0061-1-737x1024.jpg)