Friday, December 27, 2024
HomeNewsसंत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा...

संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा आळंदीत प्रारंभ

तीर्थक्षेत्र आळंदी देहूत इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेटात स्वच्छता

आळंदी/अर्जुन मेदनकर
: संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवारी ( दि. २६ ) अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान सेवकांच्या उत्साही सेवेने इंद्रायणी नदी दुतर्फा स्वच्छ करण्यात आले. या अभियानामध्ये इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा ,अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांत आढळून येणारे शेवाळ जाळी युक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले. नदीकाठचा दुतर्फा परिसर स्वच्छ करण्यात आला.

संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती दिली. परियोजना संपूर्ण भारत देशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना,वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितली.

बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे .

या परियोजनेअंतर्गत आज २६ फेब्रुवारी २०२३ रोजी, एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १ .५ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा दिली.
या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत माहिती देण्यात आली. ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे असे उपस्थित मान्यवर तसेच स्थानिक लोकांनी सांगितले.


संबंधित लेख

लोकप्रिय