Friday, December 27, 2024
Homeराज्यविशेष : आणि मार्क्स रशियामध्ये पोहोचतो..

विशेष : आणि मार्क्स रशियामध्ये पोहोचतो..

आज (5 मे) कार्ल मार्क्स यांची जयंती! ज्या मार्क्‍सच्या विचारांमुळे रशियामध्ये राज्यक्रांती घडून आली तो मार्क्स रशिया मध्ये कसा पोहोचला याचा किस्सा फार गमतीशीर आहे.

रशियामध्ये झारशाहीच्या काळात 19 व्या शतकात कुठल्याही पुस्तकांच्या, साप्ताहिकांच्या, वर्तमानपत्रांच्या प्रकाशनवर सेन्सरचे प्रचंड नियंत्रण असायचे. (याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रशियामध्ये कुठलीही पोलिटिकल स्पेस नव्हती, त्यामुळे रशियाचे लेखक, कवी, विचारवंत ही पोलिटिकल स्पेस  साहित्यामधून, कलेमधून भरून काढायचा प्रयत्न करत असत.) मार्च 1872 मध्ये सेन्सरच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलावर पोलिटिकल इकॉनॉमी या विषयावरील जर्मन भाषेत लिहिलेले एक जाडजूड पुस्तक येऊन पडलं. त्याचं परीक्षण करून सेन्सर अधिकाऱ्यांना त्या पुस्तकाचं प्रकाशन करू द्यायचं की नाही हे ठरवायचं होतं. त्या ग्रंथाचा प्रशियन लेखक  कार्ल मार्क्स हा सेन्सरना चांगलाच परीश्रुत होता. त्याच्या समाजवादी सिद्धांतांबद्दल त्याची पूर्वीची सर्व पुस्तके रशियामध्ये अगोदरच बॅन केली गेली होती आणि आता समोर आलेल्या पुस्तकाचं नशीब देखील काय वेगळं असणार नव्हतं. ते पुस्तक आधुनिक काळातील भांडवली व्यवस्थेतील फॅक्टरी सिस्टीमवर झणझणीत टीका करणारा एक स्टॅटिस्टिकल बाड होतं. 1865 साली रशियन राज्यकर्ता झार दुसरा अलेक्झांडर याने सेन्सरवरील बंधने काही प्रमाणात शिथिल केली असली तरीही अजून देखील  झारशाहीच्या दृष्टिकोनातून समाजवाद आणि कम्युनिजमच्या घातक तत्वांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या, समाजात एका वर्गाचे दुसऱ्या वर्गाशी वैर निर्माण करणाऱ्या कुठल्याही पुस्तकावर, वर्तमानपत्रावर किंवा साप्ताहिक वर बंदी कायम होतीच. त्यामुळे सामाजिक विचारमंथन घडून येऊन जनतेमध्ये राज्यव्यवस्थेविरुद्ध कुठल्याही प्रकारचा असंतोष पैदा होईल असे कुठलेही लिखाण सहसा सेन्सॉरच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे विशेषता युरोपातून येणारी नवविचारांची पुस्तके तर सेन्सरच्या रडारवर नेहमी असायची. त्यामुळेच नवीन सेन्सर कायद्यानुसार फ्रेंच तत्वज्ञ वॉल्टेअर चे Philosophy of History, डच तत्त्वज्ञ स्पीनोझा चे Ethics, इंग्रज तत्त्वज्ञ हॉब्ज चे Levithian, लेकी चे History of European Morals इत्यादी ग्रंथ हे समाजघातक ठरवून त्यावर अगोदरच बंदी घातली गेली होती. पण त्यादिवशी सेंन्सर टेबलवर आलेलं ते जर्मन भाषेतील 674 पानांचं लठ्ठ स्टॅटिस्टिकल बाड सेन्सर अधिकाऱ्यांना इतकं अवघड आणि  बोजड वाटलं की त्यांनी निर्णय दिला. हे राजसत्तेविरुद्ध समाजघातक ठरू शकत नाही. पहिला सेन्सर अधिकारी उद्गारला की खात्रीने इतकंच सांगता येईल की रशियामध्ये अगदीच थोडी लोकं हे ‘असलं’ पुस्तक वाचतील आणि त्यातील देखील हातावर मोजता येणाऱ्या लोकांनाच त्यामध्ये काय लिहिलं आहे, मांडलं आहे ते नीट समजेल. तर दुसरा सेन्सर अधिकारी म्हणाला की, या पुस्तकामध्ये लेखकाने ज्या भांडवली व्यवस्थेतील पिळवणूकीबद्दल लिहिलेले आहे त्याचा लवलेशही रशियामध्ये नाही. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना जरादेखील गरजेचे वाटले नाही की  शास्त्रीय भाषेत लिहिलेल्या अशा बोजड ग्रंथाचं प्रकाशन रोखावे. त्यांनी मार्क्सच्या भांडवल या ग्रंथाला प्रकाशनासाठी मान्यतेचा शिक्का दिला. नकळत का होईना मार्क्सच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मूलगामी विचारांवर रशियाच्या भूमीत प्रवेशासाठीची मोहर उठवली गेली. 

 

आणि अशा पद्धतीने मार्क्‍सच्या भांडवल ह्या सर्वात महत्त्वाच्या ग्रंथाचे आगमन रशियामध्ये झाले.  हा ग्रंथ  मूळ जर्मन भाषेत 1867 मध्ये प्रकाशित झाला होता. त्यानंतर तो सर्वप्रथम पाच वर्षांनी रशियन भाषेत आला. गमतीचा भाग हा की मार्क्सचे हे पुस्तक  इंग्लंडमध्ये पोहोचायला पंधरा वर्षे लागलेत. त्याची पहिली इंग्रजी आवृत्ती प्रकाशित व्हायला 1887 हे साल उजाडायला लागले, हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांच्याच अपेक्षांना धक्का देत ( जर लेखक स्वतः 1917 पर्यंत जिवंत राहिला असता तर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला असता.) या ग्रंथाने युरोपियन समाजा अगोदर रशियामध्ये क्रांती घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. वास्तविक या ग्रंथांमध्ये युरोपियन समाजाचे विश्लेषण केले होते. रशिया हा काही त्या ग्रंथाचा मूळ विषयही नव्हता. 

ज्यावेळी झारिस्ट रशियन सेन्सर अधिकाऱ्यांना त्यांची चूक उमगून आली त्यावेळी बराचसा उशीर झाला होता. वोल्गा केव्हाच लाल व्हायला लागली होती. मार्क्‍सचं कॅपिटल हा ग्रंथ रशियामध्ये सुपर डुपर हिट ठरला होता. एका वर्षाच्या आतच त्याच्या पहिल्या आवृत्तीच्या तीन हजार कॉपीज विकल्या गेल्या होत्या. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे ज्या मुळ जर्मन भाषेत कॅपिटल प्रकाशित झालं होतं त्याच्या एक हजार कॉपिज खपण्यासाठी पाच वर्षे लागली होती. मार्क्सने स्वतः कबूल केले की त्याच्या ह्या मास्टरपीसचे वाचन आणि चिंतन हे कुठल्याही इतर युरोपियन देशांपेक्षा रशियामध्ये सर्वात जास्त होत होते. रशियामध्ये त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या जवळपास सर्वच राजकीय चळवळींनी व गटांनी या पुस्तकाचे स्वागत केले. पुस्तकातील मार्क्सचे समाजशास्त्र आणि इतिहास विश्लेषण ( जरी अजून राजकीय विश्लेषण पूर्णता स्वीकारले गेले नसले तरीही) यांची जणू क्रेझच बुद्धिजीवी वर्गामध्ये पसरली.  

रशियन लेखक निकोलाय चेर्नीशेव्ह्स्की याच्या ‘व्हॉट इज टू बी डन?’ या कादंबरीनंतर कुठल्या पुस्तकाने रशियन क्रांतिकारक मनाची पकड घेतली तर तो म्हणजे मार्क्सचा कॅपिटल हा ग्रंथ. त्याकाळी रशियामध्ये मार्क्सवर कोणीही बोट करण्याची हिम्मत दाखवत नव्हतं. अशाप्रकारे त्यादिवशी सेन्सर अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या त्यांच्या ‘शहाणपणामुळे’ भांडवल सारखा आद्यक्रांतिकारक ग्रंथ रशियाच्या अंतरंगात पसरला, पुढील पन्नास वर्षे रशियामध्ये त्याने समाजवादी क्रांतीची बीजे समाजातील विविध घटकांत पेरली, झारशाहीच्या जुलमी सत्तेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या रशियन समाजातील ज्या वेगवेगळ्या क्रांतिकारक चळवळी होत्या. त्यांना एक  समाजशास्त्रीय वैज्ञानिक पाया घालून योग्य दिशेने लढा पुढे नेण्याची ताकद मार्क्सच्या या ग्रंथाने दिली आणि पुढचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहितच आहे … जगाचा इतिहास बदलला गेला होता. 

 ✍️इर्शाद बोरकर

irshadruss@gmail.com


संबंधित लेख

लोकप्रिय