सोलापूर : “उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, सोलापूर” या विद्यापीठामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये शिक्षकेतरांच्या विविध मागण्यांचे निवेदन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले.
निवेदनात 12, 24 वर्षाची रद्द केली आश्वासित प्रगती योजना लागू करून 7 व्या वेतन आयोगाचा लाभ द्या, 10, 20, 30 वर्ष लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करा, विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा 7 व्या वेतन आयोगाचा 58 महिन्यांचा फरक द्या, त्यासोबतच पी.एचडी. पदवी धारण केलेल्या शिक्षकेतरांना पुणे विद्यापीठ देत असले प्रमाणे प्रोत्साहनपर 50 हजार रुपये द्यावे, शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेल्या शिक्षकेतरांना कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून पदोन्नतीने नेमणूक करा यासोबत इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतरांच्या मागण्या ह्या कित्येक दिवस पेंडिंग असल्याने पुढील काळात संघटीत लढा आवश्यक आहे. त्यासाठी संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हे निवेदन संघटनेचे विलास कोठावळे, प्रवीण मस्तुद, शिक्षकेतर कृती समितीचे गजानन काशिद यांनी सादर केले. या निवेदनावर कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, उमेश मदने, आरती रावळे, हनुमंत कारमकर यांच्या सह्या आहेत.