नाना काटे यांचे बंड शमविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यश (SHANKAR JAGTAP)
– महायुतीचा धर्म पाळणार, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार – नाना काटे
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांचे बंड शमविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही यश आले आहे. त्यामुळे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. (SHANKAR JAGTAP)
आज (दि. ४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुतीतील बंडखोर उमेदवार नाना काटे हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार का, याबाबत अनेक तर्क- वितर्क लावण्यात येत होते. दुपारी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन नाना काटे यांच्या उमेदवारी माघारीचा निर्णय जाहीर केला.
यावेळी बोलताना नाना काटे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती. तसेच आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला होता. दोघांच्याही विनंतीला मान देऊन आणि आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी आज उमेदवारी अर्ज माघारीचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळणार असून शंकर जगताप यांच्या विजयासाठी जोमाने काम करणार आहोत.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या माघारीच्या निर्णयाचे स्वागत केले. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी नाना काटे व राष्ट्रवादी काँग्रेस मधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल महायुतीचा उमेदवार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देतो, असे जगताप म्हणाले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे, संतोष कोकणे, विजू अण्णा जगताप, राजेंद्र साळुंखे, मनोज खानोलकर, नवनाथ नढे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, शिरीष साठे, नीलेश डोके, हरिभाऊ तिकोने, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– शंकर पांडुरंग जगताप
शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)