पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि. ३० – सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, ते जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक होते.अहिंसाच्या मार्गाने सत्याग्रह आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधींजींनी जनतेचे ऐक्य, बळ वाढविले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, नगररचनाकार प्रशांत शिंपी, माहिती व जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
साधी राहणी व उच्च विचारसरणीच्या जोरावर महात्मा गांधींनी जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. स्वच्छता, स्वावलंबन, खेड्याचा विकास, सुत कताई, स्वदेशी, या मार्गांचा त्यांनी अवलंब केला. त्यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश सरकारविरोधात अनेक आंदोलने केली.