कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंधन, गॅस आणि वीज दरवाढ मागे घ्या, या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
सध्या कोविड -१९ च्या जागतिक महामारीमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. या काळात उद्योगधंदे, व्यवसाय सर्व व्यवहार ठप्प झाल्याने मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाची किंमत कमी होत असताना भारतात मात्र दररोज इंधन व गॅस दरवाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडणार आहे, त्यामुळे जनतेचे जगणे असाहाय्य होईल. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन व गॅस दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी माकपने केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्याने इंधन गॅसचे दर त्या प्रमाणांत कमी करून जनतेला दिलासा द्यावा. ही दरवाढ रद्द न केल्यास पक्षाच्या वतीने शारिरीक अंतर ठेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही माकपचे चंद्रकांत यादव यांनी दिला आहे.
यावेळी माकपचे चंद्रकांत यादव, शहर सेक्रेटरी शंकर काटाळे, राजेश वरक, विवेक गोडसे, लक्ष्मण वायदंडे आदीसह उपस्थित होते.