इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स संचालकपदी नरेंद्र पाटील यांची निवड (Pune)
पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : पुण्यातील नामांकित उद्योजक नरेंद्र पाटील यांची इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. ही बाब देशासाठी तसेच पुण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. एका मराठी माणसाची ही निवड महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. (Pune)
गेल्या तीन दशकांपासून पाटील हे उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. ब्राझील येथे जी 20 परिषद पार पडली त्यात ही ते सहभागी होते. पाटील यांची ब्राझीलमधील व्यापार आणि वाणिज्य संवर्धन, विकास आणि सुलभीकरणाशी संबंधित बाबींवर संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Pune)
द्विपक्षीय व्यापार संबंधांचा अखंड कार्य आणि विस्तार सुनिश्चित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
पाटील म्हणाले की इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदी निवड झाल्याने याचा फायदा देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुणेकर असल्याने पुण्यातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे. कारण ब्राझील, दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर संधी देते.
नैसर्गिक संसाधनांचे प्रचंड प्रमाण, विविध उद्योग, आणि मोठा ग्राहकवर्ग यामुळे ब्राझील एक आकर्षक बाजारपेठ आहे. कृषी व्यवसाय, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, रस्ते, बंदरे आणि विमानतळ विकास, तंत्रज्ञान आणि नावीन्य, ग्राहक वस्तू आणि ई-कॉमर्स, पर्यटन खाणकाम आणि नैसर्गिक संसाधने, आरोग्यसेवा आणि औषधे या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.
इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल हेन्रिक डी ऑलिव्हेरा अझेवेडो यांनी नरेंद्र पाटील यांची निवड केली असून त्यांना निवडीचे पत्र दिले असून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.