बंगलोर : सध्या कर्नाटकमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगील आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यात सोशल मीडियावर युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरीने पुरुष अधिकाऱ्यांसोबत तिचे खाजगी फोटो शेअर केल्याचा आरोप केला आहे. रविवारी जेव्हा डी रूपाने सोशल मीडियावर रोहिणीचे काही खाजगी फोटो पोस्ट केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सिंधुरी यांनीच तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना ते पाठवल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे रूपाने आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केल्याचा दावा करत रोहिणी यांनीही प्रत्युत्तर दिले.
डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. रविवारी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना डी रूपा यांनी लिहिले, “अशी छायाचित्रे सामान्य वाटू शकतात, परंतु जर महिला आयएएस अधिकारी एक, दोन किंवा तीन पुरुष अधिकाऱ्यांना अशी अनेक छायाचित्रे पाठवत असतील तर त्याचा अर्थ काय?” त्यांनी पुढे लिहिले की, ही त्यांची खासगी बाब असणार नाही, आयएएस सेवा आचार नियमानुसार हा गुन्हा आहे. कोणतीही तपास यंत्रणा या छायाचित्रांच्या सत्यतेची पडताळणी करू शकते. रोहिणी यांनी काय म्हटले – तर रोहिणी यांनी डी रूपावर प्रत्युत्तरात म्हटले की, त्या आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे.
त्यामुळे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे रोहिणी सिंधुरी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘माझी बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरून माझ्या छायाचित्रांचे स्क्रीनशॉट घेण्यात आले. मी ही छायाचित्रे काही अधिकार्यांना पाठवली असल्याचा दावा तिने केल्यामुळे, मी त्यांना त्यांची नावे उघड करण्याची विनंती करते.
एका रेस्टॉरंटमध्ये जनता दलाचे आमदार सा. रा. महेश यांच्यासोबतचे आयएएस अधिकारी सिंधुरी यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण वादाला सुरुवात झाली. 2021 मध्ये सिंधुरी यांची म्हैसूरमध्ये पोस्टिंग झाली तेव्हा दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. सध्या डी रूपा कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि सिंधुरी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉवमेंट विभागाचे आयुक्त आहेत.