Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य द्या – पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर

गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य द्या – पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर

आळंदी गणेश मंडळ बैठकीत आवाहन

आळंदी / अर्जुन मेदनकर
: गणेश उत्सवाचे काळात कोणतीही दुर्घटना होवू नये याची सर्वानी दक्षता घ्यावी. महामारीचे संकटा नंतर खुल्या वातावरणात आता गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पोलीस प्रशासनात आम्ही ही नागरिक आहे.आम्हाला ही भावना आहेत. मात्र, सार्वजनिक हिताचे दृष्टीने काळजी घेणे, नियम पाळणे, भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी मंडळांच्या परिसरात मंडळांनी भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत उपाय योजनेत सीसीटीव्ही लावावेत. उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करून सामाजिक प्रबोधनात्मक सांस्कृतिक, कला, क्रीडा, शालेय मुलांचे कलागुणांना वाव देण्यास विविध स्पर्धां उपक्रम राबविण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर केले.

चाकण विभाग अंतर्गत असलेल्या आळंदी, दिघी, चाकण, म्हाळुंगे पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या गणेश मंडळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे संवाद बैठकीचे आयोजन आळंदीत करण्यात आले होते.

यावेळी चाकण उपविभाग अंतर्गत चाकण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे) रमेश पाटील, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, माजी नगरसेवक डी. डी.भोसले, कालिदास वाडेकर, सागर बोरुंदीया, आनंदराव मुंगसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे सह पंचक्रोशीतील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गणेश उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, गेली दोन उत्सव वर्ष आपण निर्बंध असताना अत्यंत साधे पणाने साजरे केलेत. आता दोन वर्षांनी पहिल्यांदा गणेश उत्सव निर्बंधाविना साजरे होणार आहे. यासाठी सर्व घटकांनी तसेच गणेश मंडळांनी सहकार्य केले. यामुळे सर्व गणेश मंडळांचे अभिनंदन आणि कौतुक करीत आहे. येत्या उत्सव काळात देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणा-या मंडळांनी नियम, शिस्त पाळुन उत्सव साजरा करायचा असल्याचे कट्टे यांनी सांगितले. बेजबाबदार वर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मोजक्याच उपस्थिती वरून त्यांनी नाराजी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, जे पदाधिकारी येथे बैठकीला आले नाहीत त्यांना येथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांनी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. शक्यतो गणेश मंडळे नोंदणीकृत असावीत.

मंडळांनी सर्व प्रकारच्या अधिकृत परवानग्या तसेच विजजोड देखील अधिकृत घेतल्यास भविष्यात दुर्घटना घडणार नाहीत. श्रींचे मूर्तीची सुरक्षिततेस प्राधान्य द्या. स्वयंसेवक किमान एक तरी संबंधित उत्सवाचे ठिकाणी तैनात करून उत्सवात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी दक्षता घ्यावी. उत्सव काळात मंडळा जवळ जुगार, पत्ते खेळताना रेड मध्ये सापडल्यास कारवाई केली जाईल. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण विषयक नियमांचे सर्वानी पालन करून आपल्या उत्सवातून इतर नागरिकांना त्रास अथवा गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी. उत्सव काळातही डी.जे. वाजविण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे दाखल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उत्सवातील कारणांनी भविष्यात नोकरीत कोणाला अडचण येवू नये. याची काळजी घ्यावी. उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना गणेश अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. यात गौरव करताना, शिस्त, उल्लेखनीय कार्य, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, मिरवणूक लक्षवेधी आदींचा विचार केला जाणार आहे. सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रेरणा कट्टे यांनी केले.

यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे म्हणाले, उत्सव काळात डी. जे. वाजविण्यावर बंदी असून डी.जे.साठी परवानगी मिळणार नाही. कोणीही उत्सवात डी.जे. वाजवू नये. गणेशोत्सवातील काळात फक्त पाच दिवस रात्री बारा वाजे पर्यंत मर्यादित आवाज ठेवून स्पीकरला परवानगी देण्यात येईल, असे आवाहन गोडसे यांनी केले.

यावेळी पंचक्रोशीतील पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असलेल्या मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटीचे पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली. यात माजी नगरसेवक डी.डी.भोसले, आनंद मुंगसे, कालिदास वाडेकर आदींचा समावेश होता. यावेळी सूचना देत मंडळांनी मिरवणुकी दरम्यान रस्त्यावरील ओव्हरहेड वायर आणि वीज पुरवठा, श्रींचे विसर्जन कृत्रिम हौद याबाबत सूचना करण्यात आल्या. प्रास्ताविक आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी मानले. चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

लोकप्रिय