मुख्य रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडी होणार कमी (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – त्रिवेणीनगर मार्गे भक्ती शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून सध्या ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा उद्देश पुणे-नाशिक महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि निगडी भक्ती शक्ती चौक यादरम्यान वाहतूक दळणवळण सुधारणे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. या प्रकल्पातील मंजूर आराखड्यातील २५०x७५ मीटर भूभागाच्या ताब्याचा प्रश्न मिटल्यानंतर जलद गतीने प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. (PCMC)
मंजूर विकास आराखडयानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंदीचा असून सद्यस्थितीत ३७ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये १२ मीटर रुंदीच्या दोन लेन, मध्यभागी ९ मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा मास ट्रान्झिट रूट आणि रस्त्यच्या दोन्ही बाजूस २ मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर असे या रस्त्याचे नियोजन असणार आहे. सध्या दुहेरी मार्गाचे २७० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
प्रकल्पामुळे नागरिकांना होणारे फायदे
निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून पुणे – नाशिक आणि जुन्या मुंबई – पुणे महामार्गाला जोडणाऱ्या त्रिवेणीनगर मधील रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर शहरात मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची संख्या कमी होणार आहे.
यामुळे पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची तसेच इंधनाची बचत होणार आहे. तसेच हा रस्ता तळवडे संगणकीय औद्योगिक केंद्र मार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. (PCMC)
याव्यतिरिक्त, अत्याधुनिक पद्धतीने रस्ता विकसित केल्याने संबंधित भागातील जल:निसारण सुविधा, पावसाळी पाण्याचा निचरा याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या मार्गी लागणार आहेत. तसेच अद्ययावत तांत्रिक पद्धतीचा वापर केल्याने प्रदूषण कमी होऊन अपघाताचे प्रमाण देखील कमी होणार आहे.
महत्वाच्या भागांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत रस्त्याचे काम होणार पुर्ण रस्त्यासाठीच्या जागेची भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू असून आवश्यक जमीन संपादित झाल्यानंतर उर्वरित काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
मुख्य रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होऊन कमीत कमी वेळेत प्रवास सुखकर व्हावा यासाठी निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या काही भागातील जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटल्यानंतर जलद गतीने काम पुर्ण करून हा रस्ता प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्याचे महापालिकेचे ध्येय आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका