Thursday, January 2, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : २१ हजारांपेक्षा अधिक महिलांनी भरले अर्ज

PCMC : २१ हजारांपेक्षा अधिक महिलांनी भरले अर्ज

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२३ सुविधा केंद्रांवर २१ हजारांपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले असून या योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्दतीने स्वीकारण्यात येत असल्याने येत्या काळात मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली. (PCMC)

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सुविधा केंद्रांवर आजअखेर २१ हजारांपेक्षा अधिक महिलांनी यशस्वीपणे अर्ज भरले आहेत. १२ जुलै २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने तर १७ जुलै पासून ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (PCMC)

त्यानुसार अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १८५२ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १५०३ अर्ज, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १३०९ अर्ज, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २११५ अर्ज, ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत१५११ अर्ज, फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ११८८ अर्ज, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २४७० अर्ज, ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १८३१ अर्ज तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी मार्फत ३९३१ अर्ज आणि अंगणवाडी नागरी प्रकल्पामार्फत ३३७४ अर्ज भरण्यात आले आहेत. (PCMC)

महापालिकेच्या वतीने आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ५०२ अर्ज ऑनलाईन तर ९५३८ अर्ज ऑफलाईन पद्दतीने भरण्यात आले आहेत.

या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या वतीने १२३ सुविधा केंद्र, ८ ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र, ८० कोपा पास कर्मचारी, ८१ डाटा एन्ट्री ऑपरेटर,१०४ मनपा शाळेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर, २३७ महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहयोगिनी अशी यंत्रणा कार्यरत आहे. (PCMC)

नागरिकांनी ऑफलाईन पद्दतीने अर्ज भरताना अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीत तसेच अचूक मोबाईल क्रमांक द्यावा. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या ओटीपीसाठी महापलिकेच्या वतीने विचारणा करण्यात आल्यास खात्री करूनच माहिती द्यावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय