पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा रशियामध्ये सादर करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखे असून त्यांचा सामाजिक व साहित्यविषयक वारसा भावी पिढीने जोपासावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. (pcmc)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. (pcmc)
अभिवादन प्रसंगी उप आयुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सुनील भिसे, सतिश भवाळ, अरुण जोगदंड, संजय ससाणे, भगवान शिंदे, सुरेश जोगदंड, संदीप जाधव, संजय धुतरमल, यादव खिलारे, नाना कसबे, अविनाश शिंदे, राजू आवळे, मयूर गायकवाड, बाळासाहेब रसाळ, रामेश्वर बावणे, नाना कांबळे, धीरज सकट, बाबू पाटोळे, शिवाजी खडसे, बापू झाडे, आशाताई शहाणे, मीनाताई खिलारे तसेच माजी नगरसदस्य, नगरसदस्या आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या मुख्याध्यापिका व्ही.आर तिकोने, उपशिक्षीका एस.एन पाटील, एस.डी हांडे, एस.ए वाघमारे, छाया सुरवसे, मनोरंजना जाधव आदी उपस्थित होत्या. (pcmc)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहील्या असून त्यातील “फकिरा” या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी १५ लघुकथा, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील अनेक गाणी लिहिली आहेत. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे’’ असे सांगून त्यांनी कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी कथांचा वापर केला.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व संशोधक हे त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना दिसतात.