हिरे बाजार सुरतला हलवून राज्यातील कामगारांना बेरोजगार केल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मुंबईत असणारे सर्वच हिरे व्यापारी यांचे व्यवसाय मुंबईत स्थायिक आणि व्यवस्थित अनेक वर्षापासून होत असताना मुंबईतील व्यापारी कार्यालय बंद करून सुरतला घेऊन जात आहेत, ज्याप्रमाणे वेदांता फॉक्स्वान,टाटा एअरबस, प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले तसेच मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रयत्न कमी करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील असून मुंबईतला व्यापार बंद करून सुरतला गेल्याने महाराष्ट्राला कंगाल तर गुजरातला मालामाल करण्याचा डाव असल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुरत येथे ३ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून मोठे हिरे व्यापार केंद्र करण्यात आले आहे. सुरत डायमंड बोर्स असे या केंद्राला नाव देण्यात आले असून जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र असल्याची चर्चा केली जात आहे. मुंबईतील १ हजार हिरे व्यापार ऑफिस बंद करून सुरतला जाणार आहेत. त्यामुळे सध्याच्या व भविष्यातील अनेक व्यवसाय व रोजगारास संधीला महाराष्ट्र मुकणार आहे.
अनेक वर्षांपूर्वी हिरे व्यापारी हे मुंबईत व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले मात्र आता सुरत मध्ये डायमंड हब तयार करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी आपला मुंबईतील बोऱ्या- विस्तारा गुंडाळून पुन्हा सुरत ची वाट धरली आहे सुरत मध्ये हा व असे अनेक व्यवसाय गेल्याने गुजरात मधील कामगारांना हजारो लोकांना काम मिळणार आहे आणि महाराष्ट्र शासनाला विकासासाठी मिळणारा कर यामुळे मिळणार नसून महाराष्ट्रातील कामगारांचे, वाहतूकदार, प्रिंट, कारागीर, संबधित सर्वांचे काम भाजप मुळे इथले हिरावून घेतल्याची भावना राज्यात आहे. यातून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून महाराष्ट्रतील कामगार आता जागा झाला असून महाराष्ट्रातील कामगार जनतेवर अन्याय करणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही.