इचलकरंजी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आणि बाधित व मृतांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पंधरा दिवस’ ब्रेक द चेन ‘स्वरूपाचा लॉकडाऊन करावा लागला आहे. त्याच बरोबर भारताची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीही बिकट होत आहे. संकुचित स्वार्थी पक्षीय राजकारण विषारी व विखारी पद्धतीने पुढे रेटण्याची विकृती देशाची मोठी हानी करत आहे.
राजकारणाने सारे संकेत झुगारून देत केवळ सत्ताकारणाचे अत्यन्त हिडीस रूप धारण केले आहे. अशा अस्वस्थ वर्तमानात सामाजिक क्रांतीचे अग्रणी महात्मा जोतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांची दिशा निश्चित करून तसेच कविवर्य सुरेश भट यांचा “उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ” हा संदेश उराशी बाळगून आणि भारतीय राज्यघटनेतील मूल्ये समाजात रुजविण्याची समाजवादी प्रबोधिनीची पुरोगामी व प्रबोधनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी संघटीतपणे वाटचाल करण्याची नितांत गरज आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या बैठकीत बोलत होते.
प्रारंभी नगरसेवक अजितमामा जाधव यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी “प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिकाच्या एप्रिल २०२१ या (४०१ व्या) अंकाचे प्रकाशन ही करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत प्रा.रमेश लवटे, अशोक केसरकर, देवदत्त कुंभार, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, प्रा.कुबेर कट्टीमनी यांनी सहभाग घेतला.
याचर्चेत कोरोनाचे संकट, केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकांचे इष्ट – अनिष्ट परिणाम, जबाबदारी टाळण्याची विकृती, सामाजिक प्रश्नाच्या आकलनाच्या मर्यादा, वाढत्या महागाईने सुरू असलेली सरकार पुरस्कृत पिळवणूक यासह महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कविवर्य सुरेश भट यांच्या कविता, गझला यांचा जागर करण्यात आला. ११ मे रोजी शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन काम करणारी समाजवादी प्रबोधिनी ही संस्था पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे.
त्यानिमित्ताने प्रबोधीनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड, शहीद गोविंद पानसरे व विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या लोकप्रबोधन कार्याची धुरा अधिक नेटाने पुढे नेण्याची गरज प्रतिपादित केली. पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी, महामानावांच्या विचारांचा जागर करण्यासाठी, आणि समाजात सर्वांगीण समता प्रस्थापित करण्यासाठी समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात तरुणांनी व्यापक सहभाग नोंदवावा आणि प्रबोधन वाचनालय व प्रबोधन प्रकाशन ज्योती या मासिकाचे सर्व जिज्ञासूंनी वर्गणीदार वाचक व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.