यांगून : म्यानमारमध्ये सामान्य नागरिक आणि सैन्यदल यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. मागील महिन्यात उठाव करून सत्ता हातात घेतलेल्या लष्कराने देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या यांगूनच्या काही भागांत लष्करी कायद्याची घोषणा केली आहे. लष्करी राजवटीविरोधात होत असलेले आंदोलन रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कठोर कारवाईत नागरिक मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडत असतानाच लष्कराने हा निर्णय घेतला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत १३८ आंदोलक ठार झाले आहेत.
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रविवारचा दिवस सर्वांत हिंसक ठरला. दिवसभरात ३८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक ३४ नागरिक एकट्या यांगूनमधील होते, असे ‘असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर’ या देशातील आंदोलनात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा तपशील ठेवणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर येथील हलियांग थार थार आणि शेजारच्या श्वेपियता या भागांत लष्करी कायदा लागू करण्यात आला आहे.
हलियांग थार यार येथील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये गोळीबाराचा आवाज येत असून, नागरिक पळताना दिसत आहेत. यातील काही जण एका जखमी व्यक्तीला नेताना दिसत आहेत, तर अन्य दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांमधील एकाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसत आहे. ‘इंडिपेंडेंट डेमोक्रेटिक व्हॉइस ऑफ बर्मा’द्वारे हे फूटेज जारी करण्यात आले असून, ते रविवारी जिथे २२ जणांचा मृत्यू झाला होता, त्या ठिकाणचे असल्याचे सांगण्यात येते. म्यानमारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मागील सहा आठवड्यांपासून आणीबाणीची स्थिती आहे. मात्र रविवारी रात्री सरकारी दूरचित्रवाणी ‘एमआरटीव्ही’वर लष्करी कायद्याची घोषणा करण्यात आली. यानुसार कायदा व सुव्यवस्थेचे सर्वाधिकार स्थानिक पोलिसांऐवजी लष्कराने आपल्या हातात घेतले आहेत.