परळी वै. (बीड) : मोहा येथील मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेला कार्यारंभ आदेश मिळावेत यासाठी सोमवारी (ता. 30) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मोहा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली, अशी माहिती मोहाचे माजी सरपंच काॅ. अजय बुरांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मोहा गावासाठी एक कोटी दोन लक्ष रुपयाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर आहे. परंतु मागील आठ महिन्यापासुन कोरोना महामारीची साथ सुरु असल्याने कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे मंजुर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यारंभ आदेश मिळाले नसल्याने योजना रखडली आहे. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंंडे यांची सोमवारी (ता. 30) मोहा येथील माकपच्या शिष्टमंडळाने परळी येथील निवासस्थानी भेट घेतली. कॉ. अजय बुरांडे यांनी पाणीपुरवठा योजनेसह गावीतीस इतर विकासात्मक प्रश्नाची माहीती दिली.
विलंबित एक कोटी दोन लक्ष रुपयांच्या मोहा गावातील पाणीपुरवठा योजना व गावातील इतर प्रलंबित विकास कामाबाबत धनंजय मुंडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. लवकरच पाणीपुरवठा योजनेस कार्यारंभ आदेश निघतील व ही पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. या शिष्टमंडळात अजय बुरांडे यांच्यासह सुदाम शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोकाटे, विश्वांभर वाघमारे, संदिप देशमुख, वैजनाथ पाळवदे यांचा समावेश होता.