Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याAnuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता...

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. १३ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे सास्कृति कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. (Anuradha Paudwal)

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.

सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ची ही घोषणा करण्यात आली आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४ चा नाटक विभागासाठीचा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्राचा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे, नृत्य वर्गवारीत श्रीमती सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे. तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात नागेश सुर्वे (ऋषीराज), तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत, तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे. (Anuradha Paudwal)

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रूपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, मानचिन्ह व मानपत्र होते, तर आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लक्ष रोख, मानपत्र व मानचिन्ह असे झाले आहे.

मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून या पुढील काळातील सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यातही कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिकाधिक संपन्न व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सदैव तत्पर असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच हे सर्व पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

संबंधित लेख

लोकप्रिय