Tuesday, October 8, 2024
HomeराजकारणSitaram Yechury : विचारनिष्ठेचे दुसरे नाव कॉम्रेड सिताराम येचुरी

Sitaram Yechury : विचारनिष्ठेचे दुसरे नाव कॉम्रेड सिताराम येचुरी

Sitaram Yechury : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सिताराम येचुरी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात नुकतेच दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षांचे होते.

राजकारणात त्यांनी अनेक दशके काम केले. त्यांचीही राजकीय सुरुवात तळापासून म्हणजेच अगदी विद्यार्थी दशेपासून झाली होती. स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या डाव्या विचाराच्या लढाऊ विद्यार्थी संघटनेत 1974 ला त्यांनी कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. 1975 ला ते पक्षाचे काम पाहू लागले. त्यानंतर 2005 ते 2011 आणि 2011 ते 2017 या काळामध्ये ते राज्यसभेमध्ये खासदार होते. त्यांची खासदार म्हणून असलेली कामगिरी ही निश्चितच नेत्रदीपक अशीच होती. एक ठोस भूमिका घेत, अभ्यासू अशी मांडणी ते आपल्या राज्यसभेतील भाषणांमध्ये करत असत. एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची गणना नक्कीच करता येईल. त्यांचे इंग्रजी अत्यंत सोपे पण फरडे तसेच हिंदी वरही प्रचंड पकड आणि करडा आवाज या दोन्हीच्या मिश्रणाने त्यांच्या भाषणाला एक वेगळीच उंची प्राप्त होत असे. ते अत्यंत सहज बोलत संवाद करीत आहेत असेच वाटायचे. सोलापुरात त्यांचे एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानात त्यांना अनुभवण्याचा योग आला होता. त्याची आठवण यानिमित्ताने गडद झाली. एक सामाजिक भान असणारा पत्रकार, एक चांगला लेखक, एक विचारांना समर्पित असलेला कार्यकर्ता, अर्थशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख ही अमीट असेल.

काँग्रेस बरोबर अनेक बाबतीत वैचारिक मतभेद असतानाही त्यांनीच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस बरोबर आघाडी करावी असा प्रस्ताव पक्षात आणला. नुसता प्रस्तावच नव्हे तर त्या आघाडीला आकार देण्यासाठी साठी स्वतः पुढाकार घेऊन त्या आघाडीला किमान समान कार्यक्रम देताना आपल्या पक्षाची काही धोरणे ही त्यात समाविष्ट करून यावर एकमत घडवून आणले. इतकेच नव्हे तर काँग्रेस प्रणित आघाडी सरकार सत्तेत यावे यासाठी (ज्यांना डाव्यांचा चाणक्यही म्हटले जात असे) असे कॉ. हरकिशनसिंग सुरजीत यांच्या बरोबरीने ते पुढाकार घेत असत. मात्र राजकारणातून डावे कमी होत असताना त्यांच्याकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व आले. तरीही त्यांची राजकीय मते ही तितकीच दृढ व आशावादी वृत्ती असल्याने हे होऊ शकले हे कुणालाही नाकारता येणार नाही. यामुळेच कम्युनिस्ट पक्षाची राजकीय घसरण होत असतानाही त्यांचे स्वतःचे महत्त्व अबाधित राहिले हे विशेष.

काँग्रेस बरोबरच्या वैचारिक व काही बाबतीत राजकीय मतभेद असतानाही गांधी कुटुंबीयांशी त्यांचा सतत संवाद होत असे, हे त्यांचे वैशिष्टच मानायला हवे. आणीबाणीच्या विरोधातही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात ते तरुण असल्यामुळे आपसूकच पडले गेले व सक्रिय होते. तर 1977 ला तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजींच्या निवासस्थानावर काढलेल्या मोर्चात त्यांनीच मागणी पत्र वाचले होते. त्या आंदोलनाच्या रेट्यामुळे इंदिराजींना त्यावेळी पदत्याग करावा लागला होता.

पाच पुस्तकेही त्यांच्या नावावर आज आहेत. एक गोष्ट आठवते, त्यांच्याच पक्षाचे पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री कॉ. ज्योती बसू यांना पंतप्रधान म्हणून आलेली संधी केवळ “पॉलिट ब्युरो” चा निर्णय (ही कम्युनिस्ट पक्षांची हाय कमांड कमिटी म्हणता येईल) व्यक्तिशः त्यांना स्वतःला मान्य नसतानाही त्यांनी केवळ पक्षनिष्ठा म्हणून मान्य केला व पुढे योग्य संधी मिळाल्यानंतर कॉ. बसू यांच्यासंबंधीचा हा निर्णय म्हणजे पक्षाची मोठी ऐतिहासिक चूक होती हेही सुनवायला त्यांनी कमी केलेले नव्हते. आजकालच्या पक्षातील नेत्यांना केवळ तिकीट मिळते की नाही याची खात्री जरी वाटली नाही तरी शर्ट बदलाव्या इतक्या सहजपणे पक्ष बदलण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पक्षावरील अविचल निष्ठा हे त्यांची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल चांगले उद्गार काढावे यातच सर्व येते.Sitaram Yechury

सोलापुरात कॉ. नरसय्या आडम मास्तर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असताना कॉ. गोदूताई परुळेकर यांच्या नावाने होत असलेल्या गरीब कुटुंबीयांसाठी दहा हजार घरांच्या घरकुल प्रकल्पास त्यांनी केवळ पक्षनिष्ठा व सामाजिक बांधिलकी यातून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. इतकेच नव्हे तर आताही जी रे नगरातील 30000 घरे असंघटित कामगारांसाठी बांधून देण्याचे ऐतिहासिक काम कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले आहे. त्या प्रकल्पास सुद्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मदत केली होती. खरे तर या प्रकरणात कॉ. आडम मास्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आणले याच कारणावरून त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमधून काही काळ निष्काशित सुद्धा करण्यात आले होते. इतकी ही पार्टी साधन शुचिता पाळणारी आहे. आजही सोलापूर मध्य ही सोलापूरची लोकसभेची जागा काँग्रेसने आडम मास्तर यांच्यासाठी सोडावी यासाठीही सकारात्मक मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी स्वतः सोनिया गांधी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली होती.

Sitaram Yechury

12 ऑगस्ट 1952 ला एका तेलुगु ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हैदराबाद येथेच झाले तर दिल्लीतील स्टीफन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रातून बी.ए. पूर्ण केले होते. खरे तर ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती सहसा कुठल्यातरी उजव्या विचारसरणीच्या पक्षात तरी जाते किंवा “त्यांच्या” संघटनेत तरी कार्यरत असते. पण कॉ. येचुरी यांचे दिल्लीतील वैशिष्ट्य असे की, त्यांनी डावा मार्क्सवादी रस्ता पकडला आणि त्यातही त्या पक्षाचे ते सरचिटणीस म्हणून काम करू लागले ही गोष्ट त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य अधोरेखित करते. गोऱ्यापान रंगाचे, कुरळ्या केसांचे, सदैव हसतमुख असणारे आणि कुठल्याही पक्षातील व्यक्तींशी व्यक्तिगत संबंध जोडणारे असे हे व्यक्तिमत्व विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्याशीही विशेष संबंध ठेवून असणारे होते. विचार आणि व्यक्तिगत संबंध यातील फरक ठळकपणे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवला होता. अनेक पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा तसेच मनमोकळे संबंध आणि प्रचंड आशावादी असा हा माणूस आज आपल्यातून निघून जावा ही खूप मोठी दुःखद गोष्ट आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यसभेतील खासदाराची टर्म ही पॉलिट ब्युरोच्या नियमानुसार फक्त दोन वेळाच उपभोगता येते. या नियमामुळे त्यांना ती दोन वेळाच उपभोगता आली हे कटू असले तरी त्यांनी ते पक्षनिष्ठा म्हणून स्वीकारले होते ही एक खूप मोठीच गोष्ट आहे.

त्यांच्या राज्यसभेतील शेवटच्या भाषणात त्यांनी असे महत्त्वाचे उद्गार काढले होते की, “यदि आप हमारी विविधता पर एकरूपता थोपने की कोशिश करेंगे- चाहे वह धार्मिक एकरूपता हो, या भाषा की एकरूपता, या सांस्कृतिक एकरूपता, तो यह देश कभी एकजूट नही रह सकता I यह केवल बिखरही जायेगा I” इतके परखड आणि भविष्याचा वेध घेणारे उद्गार त्यांनी काढले होते, यातच त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला अनुभवास येते. त्यांनी आपल्यातून जातानाही त्यांचा देह देहदान करण्यासाठी अर्पण केला आहे. म्हणजेच त्यासाठीही त्यांनी समाजाचाच विचार केला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा या संघर्ष स्फुल्लिंगास विनम्र अभिवादन. कॉम्रेड सिताराम येचुरी (Sitaram Yechury)अमर रहे !

प्रसाद अतनूरकर, सोलापूर
9422465501

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय