कोल्हापूर : वाढती महागाईसह अन्य प्रश्नांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव प्राचार्य ए. बी. पाटील यांनी दिली.
बैठकीस राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. उदय नारकर, काॅ. सुभाष जाधव, काॅ. चंद्रकांत यादव, काॅ. भरमा कांबळे, दत्ता माने, शिवाजी मगदुम, शंकर काटाळे, अरुण मांजरे, आबासाहेब चौगुले, अमोल नाईक, मुमताज हैदर, विकास पाटील, चंद्रकला मगदुम, दिनकर आदमापुरे, शिवगोंडा खोत, आंनदा चव्हाण, नारायण गायकवाड, सदा मलाबादे, आण्णासाहेब रड्डे उपस्थित होते.
प्राचार्य पाटील म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड आणि असहाय दरवाढ, गोडे तेल, डाळी, इ. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे, गरिबांचे जगणे अत्यंत अवघड झाले आहे. सामान्य मध्यमवर्गीय भरडला जात आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे करून शेती आणि शेतकरी यांचेवर संकट लादले आहे. केंद्र सरकारने कामगारांच्या जगण्यावर हल्ला केला आहे. यापूर्वीचे कामगारांना संरक्षण करण्यासाठी केलेले सर्व ४४ कायदे रद्द करून केवळ ४ संहिता आणल्या आहेत. यामुळे कायम कामाच्या हक्कापासून, पगार, फंड, भविष्य निर्वाह निधी या सर्व हक्कावर वरवंटा फिरवला असल्याची टिका पाटील यांनी केली.
पुढे बोलतान ते म्हणाले, करोना काळात आणखी परिस्थिती गंभीर झाली आहे. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही अशी अवस्था झाली आहे. करोनामुळे जे कामगार आजारी पडले, कर्ज काढून आणि घर सामान विकून उपचार घ्यावे लागले, आजही या परिस्थितीत बदल होत नाही। करोना काळात आणखी बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्था मोडीत निघाली आहे.
केरळ सरकारने घेतलेल्या धोरणाप्रमाणे महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी खाद्य तेलासह, सर्व जीवनावश्यक १४ वस्तूंचां पुरवठा रेशन दुकानातून करावा, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर कमी करावेत, शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यात यावेत, कामगार विरोधी धोरणे रद्द करावेत, शैक्षणिक शुल्क रद्द करावे, आरोग्य व्यवस्था मोफत करावी आदी मागण्या करोनाचे सर्व नियम पाळून, मास्क सॅनिटायझर वापरून, सुरक्षित अंतर ठेवून मोजक्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच आंदोलनात सहभागी होण्याचे आवहान करण्यात आले आहे.