नवी दिल्ली : आज ९ ऑगस्टला ‘भारत छोडो’ दिनी, दिल्लीच्या सिंघू सीमेवर अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो लाल झेंडे घेऊन १,००० हून अधिक शेतकऱ्यांची मानवी साखळी करून जोरदार रॅली काढली. ५ ऑगस्ट पासून दिल्लीत असलेले तामिळनाडूचे शेतकरी त्यात मोठ्या संख्येने होते. सिंघू सीमेवर असलेल्या पंजाब आणि हरियाणाच्या हजारो शेतकऱ्यांवर या रॅलीचा चांगला परिणाम झाला आणि अनेक जण त्यात सहभागी झाले. सिंघुच्या मंचावर पोहोचल्यावर किसान सभेच्या नेत्यांची भाषणे झाली.
या कृतींचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सहसचिव विजू कृष्णन, कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, एसएफआय चे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, आणि तामिळनाडू किसान सभेचे नेते डी. रवींद्रन यांनी केले.