Thursday, November 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसर्व कंत्राटी कामगारांना किमान 15 हजार रु बोनस द्या, तो त्यांचा अधिकार...

सर्व कंत्राटी कामगारांना किमान 15 हजार रु बोनस द्या, तो त्यांचा अधिकार – कामगार नेते जीवन येळवंडे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : बोनस ही कर्मचाऱ्याला त्याच्या नियमित पगाराव्यतिरिक्त दिली जाणारी अतिरिक्त रक्कम असल्याचं म्हटलं जातं. कंपनी किंवा ठेकेदार संस्था ज्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त कामगार आहेत,ते बोनस व सानुग्रह अनुदानासाठी पात्र असतात.

The Payment of Bonus Act, 1965 कायद्यानुसार 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर आठ महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागतो. 

पुणे जिल्ह्यातील चाकण, पिंपरी चिंचवड, तळेगाव, शिरूर, रांजणगा येथील मोठ्या, लघु, मध्यम कंपन्यांतील कंत्राटी हजारो कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सारखेच काम करत आहेत. कायम कामगारांना मात्र 8.33 ते 20 टक्के बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात येते, कारण त्यांच्या संघटना असतात, मात्र कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवले जाते, मूळ कंपन्या ठेकेदार संस्थांना बोनस पेमेंट देत असतात, मात्र ठेकेदार बोनस देताना टाळाटाळ करतात, असा आरोप स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी केला आहे.

कंत्राटी कामगारांमुळे नफ्यात वाढ झाली आहे.

मागील दोन दशकात अल्प वेतनात 12 तास राबणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले युवा, महिला, मुली व उत्तर भारतातील स्थलांतरीत कामगारांमुळे सर्व उद्योगात भरभराट झालेली आहे. त्यांना कामगार कायदे माहीत नाहीत, त्यांनी संघटना करू नये यासाठी ठेकेदार संस्था, मालक प्रयत्न करत असतात, उत्पादन, पुरवठा साखळीतील सर्व कामगारांना किमान 15 हजार रुपये बोनस मिळालाच पाहिजे, ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी असा आदेश कामगार आयुक्तांनी काढावा, त्याची माहिती वप्रसिद्धी वर्तमानपत्र माध्यमात व नोंदणीकृत कामगार संघटनांना द्यावी, तसेच तो आदेश कंपन्याच्या नोटीस बोर्डवर लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी कामगार नेते जीवन येळवंडे यांनी केली आहे.

दिवाळी या सणाची काही जण आतूरतेनं वाट पाहात असतात. त्याचं कारण म्हणजे दिवाळीवेळी मिळणारा बोनस आहे. हा बोनस एकरकमी खात्यावर येतो. यावेळी अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात किंवा काही जण ते पैसे गुंतवतात, तरुण वर्ग आपली हौस-मौज पूर्ण करतो. पण हा बोनस त्यांना मिळतो काय? ही रक्कम आपल्याच पगाराचा एक हिस्सा असतो. ज्यांचा पगार 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कंपनीला बोनस द्यावाच लागतो. बोनस मिळवण्यास पात्र होण्यासाठी कामगाराने एका आर्थिक वर्षामध्ये आस्थापनेची किमान 30 दिवसांची सेवा करणे अधिनियमानुसार आवश्यक आहे.त्यामुळे सर्व कामगारांनी दिवाळी पूर्वी बोनस द्यावा,अशी मागणी करावी, असे आवाहन कामगार नेते जीवन येळवंडे यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय