पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आशिया खंडातील श्रीमंत असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट, सुंदर शहर या गोंडस नावाखाली शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांवर कारवाई सुरू आहे.पथ विक्रेता कायद्याची पायमल्ली करून मनपा प्रशासनाकडे असलेल्या यंत्रणांचा , पोलीस व महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्सचा गैरवापर करत गोरगरीब, सचोटीने व्यवसाय करणाऱ्या हातगाडी स्टॉलवर शहरात मा. न्यायालयीन आदेश झुगारून कारवाई सुरू आहे.
“फ” क्षेत्रीय कार्यालयाकडून सिताराम बहुरे यांचे आदेशाने सुपीक डोक्यातून सुचल्या प्रमाणे थरमॅक्स चौक ते साने चौकाजवळ ओम साई मार्केटच्या समोर सुमारे १५ वर्षापासून फळ विक्री करणाऱ्या मनीषा पांडुरंग शेळवणे यांच्याकडे अतिक्रमण पथक कारवाईसाठी आले असता त्यांनी हात गाडीवरील सर्व फळे खाली उतरवून घेतली व रिकामी हातगाडी मनपाच्या ताब्यात दिली व त्यांनी ती जप्त केली. कारवाई पूर्ण झाली.
मात्र परत जाता जाता महिला पोलीस सुनंदा ननवरे, एस.एम. काळे, रूपाली नलावडे यांनी पोलिसांची दबंगगिरी व मनपा प्रशासनाची भीती दाखवण्यासाठी व फेरीवाल्यावर कारवाईची दहशत निर्माण करण्यासाठी, नियोजनबद्ध पद्धतीने लाथा, बुक्क्याने भर रस्त्यात सर्वांच्या समोर मारहाण केली आहे. याचा तीव्र शब्दात निषेध होत आहे. या पोलिसांवर व मनपा अधिकारी यांचेवर मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त त्वरित कारवाई करावी अशी फेरीवाल्यांची मागणी आहे.