Thursday, September 19, 2024
Homeराजकारणडॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा 'लॉग मार्च'

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांनी बेडग ते मुंबई असा ‘लॉग मार्च’ सुरू केला आहे.

बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभारण्यात येत होती. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती. मात्र, १६ जून रोजी येथील कमान ग्रामपंचायत, पोलिस व महसूल प्रशासनाने अनधिकृत ठरवून पाडण्यात आली होती. याच्या निषेधार्थ मिरजेतील प्रांत कार्यालयासमोर आंबेडकर समुदायाने आंदोलन करीत जोरदार निषेध व्यक्त केला होता.

गेल्या आठवड्यात मिरजेत आंबेडकरी समाजाची बैठक झाली. त्यामध्ये मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजातील सुमारे १५० कुटुंबांनी मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कुच केली. निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत.

सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे थेट आंदोलनानंतरही सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्याने समस्त आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे म्हणाले, ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला.

या घटनेबाबत राज्याच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनधिकृत ठरवून पाडण्यात आली, या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहास द्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.

संबंधित लेख

लोकप्रिय