‘वुई टूगेदर फाउंडेशन’ व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, चिखली प्राधिकरण या सेवाभावी संस्थांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ ही पिंपरी चिंचवड शहरातील सेवाभावी संस्था गेली दोन वर्षे आंदर मावळातील दुर्गम आदिवासी गावात सामाजिक उपक्रम राबवत आहे. मौजे सावळा येथील गोंठेवाडी, ढोंगेवाडी, आधारवाडी, मेटलवाडी, कातकरी वस्ती, कळकराई या वाड्यावस्तीवरील 200 आदिवासी कुटुंबातील माता भगीनीना दिवाळी निमित्त (दि.17 नोव्हेंबर)रोजी साडीवाटप केले.
येथील गरीब कुटुंबातील सर्व लोकांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित)राजे शिवाजीनगर, पेठ क्र.16, चिखली प्राधिकरण या संस्थेचे संचालक महेश पोळ यांनी यावेळी दिवाळी फराळ 200 पाकिटे वितरित केली.
येथील समाज मंदिरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीताताई केंद्रे, चिखली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सावळा गावच्या सरपंच मंगलताई ढोंगे, पोलीस पाटील चहादू गोंटे, माजी पंचायत समिती सदस्य नागू ढोंगे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका गोंटे, चिमाबाई ताते, माजी सरपंच नामदेव गोंटे आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
जे काही देवाने आपल्याला दिले आहे, त्यातील वाटा देत आहोत – सलीम सय्यद
जे काही देवाने आपल्याला दिले आहे, त्यातील वाटा निःस्वार्थ भावनेने कष्टकरी उपेक्षित वर्गाला परत द्यायचं, हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. आम्ही आमच्या आदिवासी सेवा केंद्र, महिला आधार केंद्र, रोजगार माहिती केंद्र, जनआरोग्य सेवा केंद्र, कायदा मार्गदर्शन केंद्र, उच्च शिक्षण सल्ला व मदत केंद्र यांच्या माध्यमातून असंघटित श्रमिक, विधवा, पीडिता तसेच विद्यार्थी युवकांना विविध प्रकारे साहाय्य करत असतो. सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन गरजू माता, भगिनी, अंध, अपंग, निराधार लोकांचे अर्ज भरून अर्थसहाय्य मिळवून देतो. शहरापासून 70 किमी दूर असलेल्या या वाड्या वस्त्यांमध्ये मागील दोन वर्षे काम करत आहोत.
आपल्या ताटातील अर्धी भाकरी इतरांना देणे ही संस्कृती – महेश पोळ
स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहेत. 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के समाजकारण हे आमचे ब्रीद वाक्य आहे,राज्यात एकूण 18 हजार व पिंपरी चिंचवड शहरात 99 केंद्र आहेत. पोट भरलेलं असताना सुद्धा खाणे ही विकृती आहे, पण आपल्या ताटातील अर्धी भाकरी इतरांना देणं ही संस्कृती आहे, आणि संस्कृती टिकली तर धर्म आणि राष्ट्र टिकेल, हा विचार गुरू माऊलीचा आहे. त्यांच्या प्रेरणेतून दुर्गम भागात बाल संस्कार केंद्रे आम्ही चालवतो, इथे आम्ही प्रथमच दिवाळीच्या भेटी देण्यासाठी आलो आहोत. दुर्गम भागातील मुलांसाठी बाल संस्कार वर्ग आम्ही चालवतो, त्यामुळे मुलांना शिक्षणाबरोबर धार्मिक, सांस्कृतिक व आधुनिक शिक्षणाचे संस्कार केले जातात. मुलांमुलीवर संस्कार केले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल, स्वामी समर्थ सेवा केंद्र व शहरातील संस्था मार्फत संयुक्त उपक्रम राबवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी युवक यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी महेश पोळ यांनी उपस्थिताना केले.
कष्ट करण्याची जिद्द मनामध्ये ठेवा – सीताताई केंद्रे
मी मराठवाड्यातील गरीब कुटुंबात जन्म घेतला अशिक्षित आहे. गावात तेरा वर्षाची असल्यापासून शेतात मजुरी केली, नंतर पिंपरी चिंचवड 1980 च्या काळात शहरात मातीकाम, सिमेंट, टाईल्स कंपनीत मोलमजुरी केली. भोसरी एमआयडीसीत कामगारांसाठी कँटीन सुरू केले, वयाच्या 17 व्या वर्षांपासून मी पहाटे उठून भजी, वडे तळत होते. आजही कॅन्टीनसेवा सुरू ठेवली आहे. गरिबी दूर करण्यासाठी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, आता शिक्षणाचे युग आहे. आमच्या काळात पाटी दप्तर पण कोणी देत नव्हते, आळस बाजूला सारून काही व्यवसाय आठवडे बाजारात सुरू करा. मी या भागामध्ये मागील वर्षभरात शालेय साहित्य, बूट चपला, किराणा दिला आहे. विधवा महिलांनी धुण्याभांड्याच्या कामातून बाहेर पडावून घरगुती व्यवसाय करावेत, आम्ही मदत करू, असे आश्वासन सीताताई केंद्रे यांनी दिले.
टीम वर्क करून संघटित व्हा !
चिंचवड येथील जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकांत पाटील म्हणाले की, या दुर्गम भागात दळणवळण, मोबाइल नेटवर्क सुविधांची कमतरता आहे. सार्वजनिक स्वछता, सामाजिक उपक्रम, अडीअडचणी सोडवण्यासाठी स्थानिक तरुण विद्यार्थी मुलामुलींनी टीम वर्क समस्या निवारणासाठी प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयंत कुलकर्णी यांनी केले.
यावेळी ऍड.विलास कडेकर, अनिल शिंदे, यशवंतराव काकडे, सरिता कुलकर्णी, रविंद्र काळे, दिलीप चक्रे, सुरेंद्र जगताप, सदाशिव जोशी, अनील पोरे, जाकिर सय्यद, इकबाल अत्तार, धनंजय मांडके, हनिफ सय्यद, गंगाराम चौधरी, श्रीकांत पाटणे, शामराव खोत, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, गुरुराज फडणीस तसेच श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित), चिखली प्राधिकरणचे कुलदीप राठोड, महेश तुरेराव, अंकुश नरवाडे, यश बिरले मयुर पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन योगेश गोंटे, साक्षी ढवळे, पूजा वडेकर, अंजना खंडागळे, गुलाब ताटे, सुनीता गोंटे, चांगुणा गोंटे यांनी केले.