कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा( सुटा ) च्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची शिवाजी विद्यापीठ येथे भेट घेऊन विविध प्रश्नांंवर चर्चा केली. यावेळी ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती ‘सुटा’ने पत्रकाद्वारे दिली आहे.
सुटाने म्हटले आहे की, नेट-सेट ग्रस्त प्राध्यापकांना त्यांची सुरुवातीपासूनची सेवा धरून पदोन्नती व पेन्शनचा लाभ देऊन लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी ‘ सुटा ‘ ने केली होती. त्याला नाम. सामंत यांनी याबाबत आपली भूमिका सकारात्मक असून न्यायालयीन निकाल झालेल्या सर्व केसेसमध्ये पेन्शन सुरू करण्याबाबत आदेश दिले असून हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा कायम स्वरूपी भरा या मागणीबाबत सामंत म्हणाले की, प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी नाही. फक्त कोविड-१९ ची परिस्थिती निवळल्यानंतर भरतीबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. तसेच आजही प्राचार्याच्या रिक्त जागा भरण्याबाबतच्या आमच्या प्रस्तावाला अर्थविभागाने हिरवा कंदिल दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सी. एच. बी. प्राध्यापकांना नियमित वेतन द्यावे, सन २०१९ -२०२० मध्ये काम केलेल्या सी.एच.बी प्राध्यापकांना २०२०-२०२१ साठी नेमणूक ऑर्डर मिळावी, प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन त्वरीत देण्यात यावे, त्याचबरोबर एम फिल पीएच.डी च्या वेतनवाढी सुरू ठेवाव्यात आदी मागण्या यामध्ये करण्यात आल्या होत्या.
उच्च शिक्षण विभागीय कार्यालयातील ७ व्या वेतन आयोगातील प्रलंबित प्रकरणे व अन्य कामाविषयी तसेच तेथील अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार व अरेरावी याबाबतही शिष्टमंडळाने सामंत यांच्यासोबत चर्चा केली. त्याविषयी बोलता सामंत म्हणाले कि, “मी आजच त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दहा दिवस बघूया आणि नंतर काही गोष्टी राहिल्यास त्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले”.
‘सुटा’ ने यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे गैरकारभाराची सविस्तर माहिती देणारे निवेदन दिले. यावेळी सावंत यांनी कारभाराच्या तक्रारीबाबतची देखील माहिती घेऊन चौकशीबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.
शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीबाबत सुटाने शिवाजी विद्यापीठाचे हित, विद्यार्थी-शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या, पारदर्शी व स्वच्छ कारभार करणाऱ्या व्यक्तीची निवड केली जावी, अशी मागणी केली, त्यावर सामंत यांनी कोणाच्याही शिफारशींचा विचार न करता पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंची निवड केली जाणार असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात ‘सुटा’ चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील, सेक्रेटरी डॉ. डी. एन. पाटील, डॉ. सुभाष जाधव, डॉ. अरूण पाटील आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. जी. कोरबू यांचा समावेश होता.