Friday, December 27, 2024
Homeराज्यपाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतिमानतेने राबवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतिमानतेने राबवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

औरंगाबाद महापालिकेच्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

औरंगाबाद : पाणी, रस्ते, रोजगार वृद्धी यासोबत पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता आणि विकास योजना गतिमानतेने राबवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे समाधान आहे. ही योजना आगामी सन २०५२ वर्षांपर्यंतच्या शहरातील लोकसंख्येचा विचार करता त्यांना लागणाऱ्या पाणी वापराचा अंदाज घेऊन नव्याने आखण्यात आली आहे. गतिमानतेने ती पूर्णत्वास नेण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाला, यावेळी ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे आदी उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. तसेच औरंगाबादकरांचेही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे या शहराच्या विकासाला अधिक प्राधान्य आहे. येथील गुंठेवारीचा प्रश्न,  सिडकोतील घरे, मालकी हक्कांचा प्रश्न याबाबत संबंधिताना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातून जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी देखील मागील आठवड्यात केली. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा हा महामार्ग 1 मे पूर्वी पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली. शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्र शासनाला पाठविण्यात आलेला आहे.

शासनाच्या विविध योजनांना गती देण्यात येत असून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तरीदेखील जनतेनेही कोरोनाच्या सद्यकाळात निष्काळजीपणा करू नये. जनतेने शासनाच्या सर्व सूचनांचे यापूर्वीही पालन केलेले आहे. तसेच यापुढेही करावे, जेणेकरून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. यासाठी मास्कचा वापर कटाक्षाने करावाच, शारीरिक अंतर राखावे व वारंवार हात धुवावेत, याबाबतही जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय