दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेची मागणी
पुणे : दूध दर पाडणाऱ्या दूध कंपन्यांचे ऑडिट करून दूध उत्पादकांची लूट वसूल करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले की, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर 10 ते 18 रुपयांनी पाडले आहेत. लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी 30 ते 38 रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून ते 20 ते 22 रुपये प्रति लिटर वर आणण्यात आले आहेत. खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी संघटितरीत्या लॉकडाऊनचा बाऊ करून हे दर पाडले असून यातून अमाप नफा कमवीला आहे. राज्यात प्रतिदिन 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन होते. पैकी 40 लाख लिटर दुध पावडर बनवण्यासाठी प्रक्रिया उद्योगात वापरले जाते. उर्वरित 90 लाख लिटर दूध, पाउच पॅकिंग द्वारे घरगुती वापरासाठी वितरित होते. शहरांमध्ये हॉटेल व चहाची दुकाने बंद असल्याने काही प्रमाणात दुधाची मागणी घटली आहे.
मात्र घरगुती दुधाचा वापर बिलकुल कमी झालेला नाही. 30 ते 40 टक्के दूध अतिरिक्त ठरावे अशी बिलकुल परिस्थिती नाही. प्रति लिटर दुधाचे दर 10 ते 18 रुपयाने पाडावे अशी कोणतीच आणीबाणी दूध क्षेत्रात निर्माण झालेली नाही. असे असताना मागणी घटल्याने दुधाचा महापूर आला अशी अत्यंत चुकीची आवई उठवून दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटले आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
राज्य सरकारने या लुटमारीची तातडीने दखल घ्यावी. सर्व खाजगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघाचे लॉकडाऊन काळात दूध खरेदी व विक्रीचे ऑडिट करावे. कंपन्यांनी प्रत्यक्षात या काळात किती दूध काय दराने खरेदी केले व किती दराने विकले याची वस्तुनिष्ठ आकडेवारी राज्य सरकारने प्राप्त करून घ्यावी व या आधारे नक्की राज्यात किती दूध अतिरिक्त ठरले होते व त्यासाठी किती भाव कमी करणे अपेक्षित होते याबाबत सखोल चौकशी करावी. अवास्तव दर पाडणाऱ्यांवर या माध्यमातून कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची या माध्यमातून कंपन्या व दुध संघांनी केलेली लूट वसूल करून शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.
तसे च पुढील काळात अशी लूटमार होऊ नये यासाठी खाजगी व सहकारी दूध संस्थांना लागू असेल असा लूटमार विरोधी कायदा करावा, दूध क्षेत्राला 80 – 20 चे रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुधातील भेसळीवर कठोर निर्बंध आणणाऱ्या उपाययोजना कराव्यात, तसेच अनिष्ट ब्रँड वॉर व लूटमार रोखण्यासाठी राज्यात एक राज्य एक ब्रॅंडचे धोरण राबवावे अशा मागण्या किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ.अजित नवले, डॉ. उदय नारकर, उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, नाथा शिंगाडे, अमोल वाघमारे, माणिक अवघडे, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे यांनी केल्या आहेत.