Thursday, December 26, 2024
HomeNewsदेशात अराजक निर्माण करणाऱ्या भाजपाला पराभूत करा – शरद पवार

देशात अराजक निर्माण करणाऱ्या भाजपाला पराभूत करा – शरद पवार

तरूणाईने निवडणूक हाती घेतल्याने नाना काटे यांचा विजय निश्चित

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि. २२ –
देश आणि राज्यात अराजकाची स्थिती भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. त्याविरोधात मत मांडण्याची संधी या निवडणुकीने निर्माण केली आहे. ही निवडणूक तरूणांनी हाती घेतली असल्याने या निवडणुकीत नाना काटे यांचा विजय निश्चत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

काटे यांच्या प्रचारार्थ चिंचवड मतदार संघात पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात जातीय तणाव वाढवायचा. हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करायची. तोडा आणि फोडा या ब्रिटीशांच्या नितीनुसार राज्य करायचे. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



हा महाराष्ट्र म. फुले आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीवर पोसलेला महाराष्ट्र जातीय विद्वेषाचे भूत फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. हा विद्वेषाच्या वातावरणाला कारणीभूत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जागा दाखवण्याची वेळ आली आहे. या पक्षाला स्वत:चे कार्यकर्ते निर्माण करता आले नाहीत. त्यामुळेच या हुकूमशाहीला ठाकरे विरोध करतील या भीतीनेच त्यांनी शिवसेना संपवण्याचा घाट घातला, असे प्रतिपादन पवार यांनी केले.

देशात सरकारविरोधी वातावरणाची लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर इडी, सीबीआयच्या धाडी टाकून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही दडपशाही लोकशाहीत चालत नाही. जनता त्याचे उत्तर मतपेटीतून देईल, असे ते म्हणाले.

आम्ही केलेला विकास ‘आम्हीच केला’ असे खोटे रेटून बोलायची नवीन पध्दत त्यांनी रुढ केली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणून सामान्य माणसांचे जीवन मुश्कील करून टाकले आहे. असे निर्णय घेण्यापूर्वी संसद आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. लहरी राजाच्या बेबंद कारभाराला आळा घालण्याची सुरवात चिंचवडमधील पोटनिवडणुकीतून करावी असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय