कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक दर्जा असताना महाडीबीटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे प्रशासन आणि शासनावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील कृषि पदव्युत्तर पदवीला ५ मार्च २०२० रोजी शासन निर्णय क्र.मकृप १०१ ९ / प्र.क्र .७६ / ७ अ नुसार व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयानुसार सर्व कृषी पदव्युत्तर पदवीच्या विध्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणे आवश्यक आहे. परंतु महाडीबीटी पोर्टल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत कृषि विद्यापीठांचे विद्यार्थ्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष झालेले दिसत आहे.
विद्यार्थ्यांनी वारंवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, वेगवेगळे मंत्री, विद्यापीठासोबत ई-मेल द्वारे पत्रव्यवहार करूनही समस्यांचे निराकरण झालेले नाही. शिष्यवृत्ती संबंधित तांत्रिक अडचणी हा विद्यापीठाचा प्रश्न असतानाही कोणतेच विद्यापीठ याची दखल घेताना दिसत नाही.
अद्यापही महा डी.बी.टी पोर्टल बंद असल्यामुळे खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांबरोबरच अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवगातील विद्यार्थ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ -२० समाप्त होत आले आहे. नवीन प्रवेश सुरु झाले असून शैक्षणिक फी भरण्यास जरी दिलासा दिला जात असला तरी महाडीबीटी पोर्टल सुरु झाले नाही तर विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कृषि अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारी सर्व मुले हि शेतकरी कुटुंबातील असतात. कोरोनाची महामारी आणि संकटात आलेली शेती यामुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांची मुले सुध्दा संकटात सापडलेली आहेत. अशा बिकट परिस्थितीत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.