मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचे सावट गंभीर होत असताना अनेकांना रोजगाराच्या चिंतेने ग्रासलेल आहे. अशात राज्य सरकारं राज्यातील पोलिस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्य पोलिस दलात डिसेंबर २०२० पर्यंत विविध पदांवर १२ हजार ६५३८ कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे.
गृहमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट-क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा ६७२६ पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२५३८ पदे भरण्यात येणार आहेत,अशी माहिती देशमुख यांनी दिली.
२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा
२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल.
पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.