(वडवणी) :- वडवणी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून रात्रीच्या वेळी जोरात पाऊस झाला. तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले आहे, तरी या प्रकल्पाच्या नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वडवणी तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघु मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणाऱ्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत असून वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणाऱ्या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे, प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग हा पुढे नदीपात्रात केला असून परिणामी या प्रकल्पालगतच्या व नदी पात्राकाठच्या सर्व गावांना याचा सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
नदीपात्रा लगतच्या सर्व शेतकरी व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देत या नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये तसेच कोणीही नदीपात्रात आपली जनावरे सोडू नये सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व संबंधित गावाच्या तलाठी व ग्रामसेवक यांना याबाबत गावात दवंडी देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर तसेच वडवणी तहसीलदार किशन सांगळे यांनी दिली आहे.