तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सत्तूर जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खासगी कारखान्यात फटाके तयार करण्यासाठी काही केमिकल्सचं मिश्रण केलं जात असताना ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्फोट होताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण केमिकल्समुळे आग विझवण्यात त्यांना अडचण येत होती. प्राथमिक तपासात कारखान्यात नियमांचं पालन केलं जात नसल्याने आग लागली असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी तीन लाखांची मदत जाहीर केली आहे.