Thursday, December 26, 2024
Homeआंतरराष्ट्रीयपत्रकाराच्या अटकेसाठी ग्रीसचे विमान बेलारूसने जबरदस्ती उतरवले

पत्रकाराच्या अटकेसाठी ग्रीसचे विमान बेलारूसने जबरदस्ती उतरवले

राष्ट्रपतींच्या आदेशावरून रचले नाट्य : पत्रकाराच्या अटकेसाठी पसरवली बॉम्बची अफवा, फायटर जेट पाठवून उतरवले 

ग्रीस : पत्रकाराला अटक करण्यासाठी विमानात बॉम्बची अफवा पसरवली. नंतर फायटर जेट मिग- २९ पाठवून विमानाला खाली उतरवले. व लष्कराचे ६० जवान पाठवून एका पत्रकाराला अटक केली. फक्त सरकारवर टीका करत असल्याने हे नाट्य घडवून आणले गेले. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही तर सत्यघटना आहे, जी रविवारी बेलारूसमध्ये घडली. हे सर्व नाट्य रचले होते बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी.

२६ वर्षांचे रोमन दिमित्रियेविच प्रोत्साविक पत्रकार आहेत. ते बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंकोचे प्रखर विरोधक समजले जातात. ते रविवारी ग्रीसहून लिथुआनियाला जात असतांना त्यांना अटक करण्यात आली. या वेळी त्यांच्या विमानाला जबरदस्तीने बेलारुसच्या मिंस्क विमानतळावर उतरवण्यात आले व अटक करण्यात आली. 

रोमन बेलारुसच्या विद्यापीठात पत्रकारितेचा विद्यार्थी होता. मात्र सरकारवर टीका केल्याने त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. त्याच्यावर दंगल भडकावणे व देशद्रोहाचे आरोप करण्यात आले. मात्र न्यायालयाने सर्व आरोपातून मुक्त केले होते. रोमन २०१९ मध्ये पोलंडला गेला. जानेवारी २०२० मध्ये पोलंडकडे आश्रय मागितला. तेथे नेक्स्टा नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. गेल्या वर्षी या चॅनलने बेलारुसच्या राष्ट्रपतींविरोधात अनेक बातम्या दाखवल्या. बेलारुस सरकारने रोमन विरोधात अनेक खटले दाखल केले. त्याला अतिरेकी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

ब्रिटन, अमेरिकेकडून निषेध, सुटका करण्याची मागणी

पत्रकाराच्या अटकेवरून युरोपियन संघ, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन व अमेरिकेने टीका केली आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हायको मास यांनी ही घटना हायजॅक असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले, बॉम्बची अफवा पसरवून एखाद्याला अटक करणे गंभीर आहे. युरोपीय युनियन, फ्रान्सने बेलारूसकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी रोमनला सोडण्याची मागणी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय