नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. दिवसेंदिवस भीषण परिस्थिती निर्माण होत आहे. देशभरात ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तीव्र शब्दांत सुनावलं आहे.
दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असे म्हणत केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहे.
“लोकांचे जीव सरकारसाठी महत्त्वाचे नाहीत का?” असाही सवाल यावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. जर पर्याय नसेल, तर देशातील उद्योगधंद्यांचा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वळवा, असे निर्देश यावेळी कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.
दरम्यान, देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यामुळे २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.