जुन्नर तालुक्याच्या उत्तरेस ६२ कि.मी व संगमनेर पासून पश्चिमेस २२ कि.मी अंतरावर डोंगर द-याखोर्यात वसलेले व ३,५०० लोकसंख्या असलेले अहमदनगर जिल्हयातील व संगमनेर तालुक्यातील खेडेगावाकडे जुन्नरहुन माझी पत्नी स्वाती, अमोल भारमळ, दिपक कठाळे व लहान मुलगा मयुरेश आमचा प्रवास पेमगिरी गावाकडे सुरू झाला होता. (Banyan tree)
एकेकाळी पेमगिरी गाव ‘बांगड्यांच्या, निर्मिती साठी प्रसिद्ध होते. येथील बाळेश्वराच्या डोंगररांग चुनखडकांच्या स्तरांनी व्याप्त आहेत आणि त्यामुळेच येथील येळुशिदर्यात अभ्यासकांना जीवाश्म पण सापडली होती. येथे भरपूर प्रमाणात त्यावेळी पाणमळे असत. आता लिंबाच्या व सिताफळाच्या बागा खुप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. १९३० मध्ये जंगल सत्याग्रहामुळे पेमगिरी प्रकाश झोतात आला.
पेमगिरीच्या चहूबाजूंनी उंच डोंगर असल्याने हिरवाईचे व धबधब्यांचे मनमोहक नयन दृश्य पावसाळ्यात पहावयास मिळते. आज हे गाव जगात ओळखले जाते ते अडिच एकर मध्ये अतिशय जुने असलेल्या एकाच वटवृक्षामुळे. गावच्या जवळच अडीच कि.मी अंतरावर ‘मोरदरा’ नावाच्या भागात एक महाकाय वटवृक्ष आजही शेकडो वर्षे वादळ वा-यात तोंड देत उभा आहे.
या वृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फुट असून जवळपास एकूण ९० पारंब्यांनी वडाच्या उत्तर – दक्षिण व्यास ३०० फुटापर्यंत तर पूर्व- पश्चिम व्यास २८० फुटांवर व्यापला आहे. या वटवृक्षाखाली भिल्ल- रामोशांची जाखाई – जाकमतबाबा ही देवते कोरलेल्या दगडीशिल्पांत दिसून येतात. आणि याबाबत दंतकथाही मोठी रोमांचक सांगितली जाते. (Banyan tree)
गुराढोरांचा सांभाळ करणारे एक रामोशाच पोरग म्हणजेच जाकमतबाबा आपल्या शेळ्यांवर अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्याला परतून लावण्यासाठी वाघाशी झुंजत होते. वाघ पंजांनी व दातांनी बाबांना व बाबा हातात असलेल्या कु-हाडीने वाघावर वार करण्याच्या झटापटीत एकमेकांना वाचविण्याच्या झटापटीत गंभीर जखमी होतात. दोघांचेही रक्तरंजित देह अखेरचे श्वास तेथेच सोडतात. हे दृष्य जाकमत बाबाची बहिण जाखाई पहाते. तीला दुखः अनावर होते. ती भावाच्या मृतदेहावर पडून जोर जोरात आक्रोश करते व त्याच आक्रोशात तीचा पण श्वास बंद होतो.
बाबाची आपल्या शेळ्यामेंढ्यावर असलेली श्रध्दा व बहिणीची भावावर असलेली माया अनेक कालांतरे टिकून रहावी म्हणून रामोशी समाज याच वडाच्या झाडाखाली त्यांच्या मुर्तीची स्थापना करतात व आजही ती तेथे पहावयास मिळते. पुढे या वटवृक्षाचे दैवतीकरण झाले. जो कुणी या वटवृक्षास विजा पोहचवेल त्यास खुप संकटांना तोंड द्यावे लागत असे त्यामुळे या वृक्षाला कोणत्याही प्रकारची वीजा कोणी पोहचवत नसे.
म्हणूनच आज महाराष्ट्रात या वटवृक्षाचे महाकाय वटवृक्षात रूपांतर झालेले पहावयास मिळत असून याच वृक्षाच्या माध्यमातून या गावची ओळख जगविख्यात होऊ लागली आहे. वृक्षामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे हे मात्र नक्कीच आहे.
पेमगिरीची दुसरी ओळख म्हणजे येथील स्थानिकांच्या तोंडुन ऐकलेली अहिल्याबाई होळकर नावाची प्रसिद्ध बारव. या बारव बांधनित शके १६२८ चा उल्लेख असलेला शिलालेख येथे पहावयास मिळतो. जवळच उभा असलेला “पेमगड” अर्थात शहागड, संगमनेर तालुक्यातील एकमेव असलेला हा किल्ला.
निजामशाहीच्या अखेरच्या काळात शहाजी महाराजांनी जुन्नर तालुक्यातील “जीवधन” किल्यावर कैदेत असलेल्या “मुर्तजा” नावाच्या निजामशाहाच्या वारसाची सुटका केली, आणि पेमगिरीच्या “भिमगडावर” या बालवारसाला राज्याभिषेक करून निजामशाहीची पुनर्स्थापना केल्याचे भासवून स्वतः राज्यकारभार केला, आणि स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. (Banyan tree)
परंतु स्वकियांच्याच अहंकारामुळे त्यांची मुत्सद्देगीरी यशस्वी होऊ शकली नाही,व वर्षभराच्या प्रयत्नांनंतर त्यांना भिमगड सोडावा लागला. माता जिजाऊ शिवबा उदरी असताना याच गडावर काही दिवस राहीले असल्याचे सांगितले जाते व तेथून त्या शिवनेरीवर आल्यानंतर तीन दिवसांनी किल्ले शिवनेरीवर माता जिजाऊंच्या पोटी महाराष्ट्राचा सुर्योदय जन्माला आला.
किल्ले पेमगडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांची रचना सातवाहन काळात झालेल्या असल्याचे ठामपणे सांगावेसे वाटते. परंतु या किल्याला संरक्षणार्थ फारसे महत्त्व नसावे असे त्याच्या रचनेतुन भासते. (Banyan tree)
गडावर पेमादेवीचे मंदिर असून गडाचे सौंदर्य वाढिसाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती वनविभागामार्फत अतिशय सक्रिय असल्याचे जाणवते. गावातील ७५ वर्षे जुने चारमंजील सागवानी हनुमान मंदिर आकर्षित करत आहे. याच देवाला येथील ग्रामस्थ साकडे घालून दिनचर्या सुरू करतात. असा हा अलौकिक सौंदर्याने नटलेला परिसर पाहताचक्षणी डोळ्याचे पारणे फिटले. वृक्षप्रेम कसे असावे ते कधी पहावयाचे झालेच तर तेथे जाऊन नक्की पहा.
लेखक – रमेश खरमाळे, वनरक्षक जुन्नर