Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २ रे राज्यस्तरीय मराठी संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील...

बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २ रे राज्यस्तरीय मराठी संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील महत्वाचे पदचिन्ह – नारायण जोशी

नागपूर : बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २ रे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील महत्वाचे पदचिन्ह आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक नारायण जोशी यांनी व्यक्त केले.

बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे राज्यस्तरीय दुसरे मराठी साहित्य संमेलन दि . १४ मे २०२३ रोजी रविवारी दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अत्रे ले आऊट नागपूर येथे अतिशय उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ नारायण जोशी होते.



अध्यक्ष पुढे म्हणाले की, अशी विभागीय संमेलने ही आजची गरज आहे. संमेलनाचे उद्‌घाटक सिनियर सिटीझन कौंसिल चे सचिव सुरेश रेवतकर यांनी संमेलनासाठी मदत करण्यास सदैव तयार आहे असे म्हणून शुभेच्छा दिल्या. नांदेडचे प्रा. डॉ. आबासाहेब कल्याणकर यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट चे मिश्राजी विशेष अतिथी उपस्थित होते. खऱ्या साहित्यिकांना मंच मिळायला हवा असे विचार त्यांनी मांडले. दत्ताजी मेघे, जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते.



सर्वप्रथम दीप प्रज्वलनानंतर विद्या बोरकर यांनी सरस्वती स्तवन केले. समुह संस्थापक आणि स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर यांनी प्रास्ताविक केले आणि संमेलनाची भूमिका विशद केली. प्रथम साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि गझलकारा प्रा. सुनंदा पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवीन अध्यक्षांच्या हाती सुपूर्द केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गझलनंदा यांच्या लोकव्रत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या “सावली अंबराची” या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. स्त्रीचे भावविश्व उलगडून दारवविणाऱ्या, आणि इतरही एकूण १०० उत्तमोत्तम गझलांचा समावेश असणारा हा गझलसंग्रह त्यांनी सुरेश भट यांचा वसा आणि वारसा चालविणाऱ्या गझलकारांना अर्पण केला आहे. विशेष म्हणजे “गझलनंदाच्या गझलेतील स्त्री उद्गार” हा प्रसाद कुलकर्णी यांचा लेख अतिशय अभ्यासपूर्ण असून, नवीन गझलकारांसाठी” गझलेचे स्वयंअध्ययन आणि अंकलिपी हा महत्वपूर्ण लेख यात आहे. या प्रसंगी प्रा. सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



तसेच वीणा रारावीकर यांच्या “गुजगोष्टी शत शब्दांच्या” या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कै. डॉ. सितारामपंत अंदनकर स्मृती कथासंग्रह पुरस्कार, कै. लक्ष्मीकांत दीक्षित स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार, कै. शकुंतला दीक्षित स्मृती प्रथम प्रकाशन पुरस्कारांचे वितरण झाले
यावेळी प्रा. सुनंदा पाटील, प्रसाद कुलकर्णी इचलकरंजी, पल्लवी उमरे मुंबई, वर्षा पतके थोटे आशुतोष रारावीकर इत्यादी विजेते उपस्थित होते. यावेळी सिनेजगतातील मान्यवर माधुरी अशिरगडे यांचाही सत्कार झाला.

यानंतर गझलनंदा यांच्या अध्यक्षतेखाली एक दमदार गझल मुशायरा झाला. श्रेत्यांची वारंवार दाद घेत अनेक गझलकारांनी आपल्या गझल सादर केल्या. नांदेडचे प्राचार्य डॉ. आबासाहेब कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली आणि संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले. यावेळी ४० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. जालना येथील दिव्यांग कवी आकाश देशमुख यांची संमेलनाला उपस्थिती हा या संमेलनाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा वगरकर आणि प्रा. भारती दवणे यांनी केले. सह आयोजक श्रीराम अंदनकर यांची कार्यक्रमाच्या यशस्वितेत प्रमुख भूमिका होती. या एकदिवसीय संमेलनात श्रोत्यांची आणि संमेलनाध्यक्षापासून सर्व निमंत्रितांची शेवटपर्यंत उपस्थिती ही विशेष बाब होती.

संबंधित लेख

लोकप्रिय