Home पुणे - पिंपरी चिंचवड Alandi : आळंदीत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी पूर्ण

Alandi : आळंदीत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी पूर्ण

Alandi

सादर अहवालावर आळंदीकरांना कार्यवाहीची प्रतीक्षा (Alandi)

आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये शालेय शिक्षणासमवेत वारकरी संप्रदायिक शिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुवा मंडळींनी वारकरी शिक्षण संस्थांच्या नावाखाली व्यवसाय सुरू केला असून काही वारकरी शिक्षण संस्था मध्ये अनैसर्गिक लैंगिक कृत्य झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (Alandi)

यात अनेक गुन्हे आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीची प्रतिमा मलीन झाल्याने स्थानिक नागरिक ग्रामस्थ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत आपली भूमिका जाहीर केली. अशा घटना या पुढील काळात होऊ नयेत तसेच या संस्था तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी मागणी करून राज्य शासनाकडे विविध ठिकाणी निवेदन देऊन या प्रकरणी महिला आयोगाचे देखील लक्ष वेधले.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या आळंदीकरांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आळंदीत संबंधित शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

सदर बैठकीत या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून तीर्थक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असल्याने येथील तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जोपासणे हे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ४८ तासांत आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाया बरोबर शालेय शिक्षण देणाऱ्या संस्थांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

बुवा मंडळींच्या माध्यमातून अनाधिकृत शिक्षण संस्था चालविल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आळंदीकर ग्रामस्थांनी वारकरी शिक्षण संस्था तात्काळ बंद करण्यात याव्यात यासाठी मागणी करून निवेदन दिले होते. त्यावर दखल घेत अनधिकृत वारकरी संस्थांची तपासणी करण्यास दोन दिवस देवून अहवाल 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिले होते. (Alandi)

त्याप्रमाणे 20 समिती करण्यात आल्या होत्या. यात प्रत्येक समितीत दोन सदस्य आणि एक समिती अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. यात महिला व बाल विकास विभाग, महसूल विभाग, गृह विभाग, शालेय शिक्षण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, आळंदी नगरपालिका यांची समिती गठित करण्यात आली होती.

या समितीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदी पंचक्रोशीत चालविण्यात येणाऱ्या बालकांच्या वस्तीग्रह यांची समिती मार्फत अनधिकृत संस्थांची तपासणी करण्यात आली. या बाबतचा अहवाल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

या तपासणी साठी विविध नमुन्यात तपासणी अहवाल आणि अभिप्राय देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

त्याप्रमाणे आळंदी परिसरातील आळंदी चऱ्होली खुर्द आणि बुद्रुक, केळगाव, चोविसावाडी, डुडुळगाव या परिसरातील बुवा मंडळींच्या कडून सुरू असलेल्या अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था यांची तपासणी करण्यात आली. समिती अध्यक्षांकडून स्वयं स्पष्ट अहवाल आणि अभिप्राय ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

वीस समिती अध्यक्ष यांचे तील अध्यक्षांना संपर्क करण्यात आला होता. मात्र अनेकांचा संपर्क झाला नाही. ज्यांचा संपर्क झाला त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आळंदीत विविध संस्थांत तपासणी पथक समितीने भेट देत तपासणी केली असून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मात्र यास दुजोरा मिळत नाही. अधिकारी काही बोलण्यास धजत नाही.

काही संस्थानची तपासणी झाली नसल्याचे बुवा मंडळी सांगतात. सरसकट तपासणी करणे आवश्यक असताना केवळ १७५ संस्था असल्याचे बोलत तेवढीच संख्या गृहीत धरून तपासणी करण्यात आली. अनेक संस्थांची तपासणी झाली नसल्याने कोणाचे सांगण्यामुळे काही संस्था वगळण्यात आल्या. अशी चर्चा आळंदीत जोर धरू लागली आहे.

Exit mobile version