Wednesday, February 28, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : वायू प्रदूषण मुक्त शहरे ही सामूहिक जबाबदारी – डॉ.किशोर...

विशेष लेख : वायू प्रदूषण मुक्त शहरे ही सामूहिक जबाबदारी – डॉ.किशोर खिल्लारे

देशातील मेट्रो सिटी दिल्ली, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह विविध शहरात यावर्षी वायू प्रदूषण नियंत्रणाबाहेर गेले. त्यामुळे केंद्र राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली. मागील दहा वर्षात वाढलेली वाहनांची संख्या, सतत सुरू असलेली विकासकामे, वाहतूक कोंडी, कचरा ज्वलन, औद्योगिक धूर, बांधकामांचा राडारोडा यामुळे पिंपरी चिंचवड शहरात वायू प्रदूषण पातळी धोकादायक गुणवत्ता निर्देशांक ओलांडून अति धोकादायक झाली आहे.

शहरात धूलिकण आणि कार्बन डायॉक्साईड शोषणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे हवेमध्ये धूलिकण तसेच तरंगत श्वासावाटे ते मानवी फुफ्फुसात जात आहेत.

सकस आहार घेतला तरी पण प्राणवायू प्रदूषण असेल तर शहरातील आरोग्य बिघडते. कोरोना काळात वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे देशात व पिंपरी चिंचवड शहरात वायु प्रदुषण कमी झाले होते. शुद्ध हवा हा निरामय आरोग्यासाठी नागरिकांचा अधिकार आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक नुसते संभाव्य वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) चांगला (०-५०)    कमी जोखीम समाधानकारक, (५१-१०० ) असुरक्षित लोकसंख्येत श्वासोच्छ्वास घेण्याचा किरकोळ त्रास, मध्यम (१०१-२००) असुरक्षित लोकसंख्येत श्वासोच्छ्वास किंवा आरोग्याशी संबंधित इतर अस्वस्थता. खराब (२०१-३००) दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी तसेच असुरक्षित नागरिकांना श्वास घेण्यास त्रास. (३०१-४००) अतिशय त्रासदायक अशी गुणवत्तेची वर्गवारी आहे.

सर्वसाधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात ऋतुबद्दल होतात. हवामान थंड व दमट असते. याच काळात दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे प्रदुषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. साधारणपणे दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान येते. या ऋतूबदलानंतर थंडी सुरू होते. थंडीत प्रदूषण पातळी बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत श्वसन विकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर आणि नायट्रेस बाहेर पडतात. ज्याचा सर्वाधिक त्रास वृध्द ,अस्थमा, श्वसनाचा आजार असलेले रुग्ण, गर्भवती माता, नवजात बालकांना होतो. 

उच्च पातळीच्या प्रदूषणाच्या संपर्कात असलेल्या महिलांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. सूक्ष्म कणांच्या संपर्कात असलेल्यांमध्ये हे विशेषतः सामान्य आहे. शुद्ध हवा फुफ्फुसासाठी आवश्यक आहे, त्यातील ऑक्सिजन ज्याला प्राणवायू असे म्हणतात तो रक्ताभिसरण यंत्रणा निरामय ठेवतो.

वायू प्रदूषणामुळे जळजळ, पित्त विकार, अपचन, खोकला, कफ आदी विकार उद्भवतात. प्रदूषित हवेतील धूलिकण, सल्फर, कार्बन, सल्फर,  शिशे युक्त श्वासावाटे घेतल्याने यकृत, मध्यवर्ती मज्जासंस्था आणि मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते.

जर एखाद्या व्यक्तीने श्वास घेतलेले प्रदूषक शरीरात खोलवर शिरले आणि रक्तप्रवाहात पोहोचले, तर अनेक आरोग्य-संबंधित समस्या अनुभवल्या जाऊ शकतात. ज्यासाठी भारतातील सर्वोत्तम हृदयरोग तज्ञांकडून मूल्यांकन आवश्यक आहे. अवयवांपर्यंत पोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने रक्तनिर्मिती कमी होऊ शकते.

नोव्हेंबर २०२३ पासून राज्यात वेगवेगळ्या शहरात हवेची गुणवत्ता बिघडली असुन हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० च्या पुढे गेल्याचे आढळून आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकरिता जनजागृती करणे. तसेच, वायु प्रदुषणाचे वाईट परिणाम होऊ शकतात अशा घटकांवर होणाऱ्या परिणामांपासून बचावासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सल्ला देण्यात आला आहे. बांधकामे व राडारोडा आच्छादित करण्याचे आदेश देण्यात आहेत. सर्व जिल्हे, महानगरपालिका यांन उपायोजना आणि जनजागृती कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

विकासाबरोबर समृद्धी येते, पण पैसे देऊन शुद्ध हवा विकत घेता येत नाही

तुम्ही पैसे देऊन तूप, लोणी, शुद्ध आहार विकत घेऊ शकता. इतकेच नाही, तर घरात फिल्टर बसवून शुद्ध पाणी पिऊ शकता. विकत घेऊ शकता. समृद्ध श्रीमंत पैसे खर्च करून उच्च प्रतीचे महागडे उपचार घेऊ शकतात. तुमच्याकडे किंवा सरकारने पैसे खर्च केले तरी संपूर्ण शहरात हवा शुद्ध करणारे फिल्टर बसवणे शक्य नाही. वायू प्रदूषण ही गंभीर जागतिक समस्या आहे. चंगळवादी जीवनशैली, अमर्याद भौतिक नफेखोरी शहरी विकास यामुळे शहरे बकाल होत आहेत.

शहरात अल्पउत्पन्न घटकातील कंत्राटी कुटुंबे सामाजिक, आर्थिक परिस्थिती ज्यांची पोषणस्थिती खराब आहे. चाळीचाळीत, भाड्याच्या घरात राहणाऱ्या गोरगरीब लोक सर्वाधिक आजारी पडतात. पिंपरी चिंचवड शहरातील मनपा व इतर शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवेवर सध्या मोठा ताण आहे. समृद्ध वर्गातही आजार वाढले आहेत. वयोगट पाच वर्षाखालील मुले व वृद्धापकाळातील व्यक्ती, गर्भवती महिलांच्या गर्भातील बाळावर प्रदूषित हवेमुळे परिणाम होऊ शकतात. दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती ज्यांना श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जुने आजार आहेत त्यांना जास्त धोका असतो. 

निरामय आरोग्यासाठी आपण काय करू शकतो?

विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील हिरवळ नष्ट होते आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर  शहरात वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. पिंपळ, वड, चिंच, उंबर, फणस, कडुलिंब आदी वृक्ष तसेच घरामध्ये तुळस, नागवेल किंवा वृक्ष तज्ज्ञांच्या सल्ल्याने नर्सरीतील काही निवडक झाडे घरात व परिसरात लावली पाहिजेत. झाडे ही शुद्ध हवेची एटीम सेंटर आहेत. हा विचार करून सरकार, मनपा, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी जल, जंगल, जमीन व आकाश ह्यांचा शाश्वत विचार करून निरामय आरोग्यासाठी वसुंधरेचे रक्षण केले पाहिजे.

– डॉ.किशोर खिल्लारे,

  शहरी आरोग्य अभ्यासक, पिंपरी चिंचवड (पुणे)

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय