नाशिक : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कागदपत्रे फेरफार व फसवणुकीच्या आरोपांवर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१९९५ च्या प्रकरणाचा निकाल २९ वर्षांनी
हे प्रकरण १९९५ ते १९९७ या कालावधीतील आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शासनाकडून मिळणाऱ्या सदनिकांसाठी अर्ज करताना खोटी माहिती दिली होती. त्यांनी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही, असे भासवून सदनिका घेतल्याचा आरोप होता. तत्कालीन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
कोर्टाच्या निर्णयाचा राजकीय परिणाम? (Manikrao Kokate)
नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांचे आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. भारतीय कायद्यांनुसार, लोकप्रतिनिधीला दोन किंवा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असते.
या निकालाविरोधात माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात धाव घेतील, असे बोलले जात आहे. मात्र, जर उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली नाही, तर त्यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते.
या प्रकरणात एकूण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, इतर दोन आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधू सुनील कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसांत कोकाटे उच्च न्यायालयात जातात का, त्यांना स्थगिती मिळते का, किंवा त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा :
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!
‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ
धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री