शिवनेरी (ता. जुन्नर) : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकोट हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत आहे. त्याचबरोबर, राज्यातील १२ गड किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकनासाठी निवडले असून, आगामी आठवड्यात पॅरिस येथे होणाऱ्या महासभेत त्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवनेरी किल्ल्यावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धे नव्हते, तर उत्तम प्रशासक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहिले. स्वराज्याच्या राजधानी रायगड किल्ल्यावर तसेच शिवनेरीवरही विकासकामे सुरू आहेत. शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला थारा दिला जाणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांचे १२ किल्ले जागतिक स्तरावर ओळख मिळवणार आहेत.”
गडकोटांचे संवर्धन आणि पर्यटकांसाठी सुविधा – एकनाथ शिंदे
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अठरा पगड जातींना एकत्र आणून मावळ्यांची फौज उभी केली. त्यांच्या गडकोटांमध्ये पराक्रमाचे साक्षीदार असलेले स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यामुळे गडकोटांच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्यात येत असून, त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करून विशेष पर्यटन सर्किट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
शिंदे पुढे म्हणाले, “शिवरायांच्या आरमारी शक्तीने भारतीय नौदलाला प्रेरणा दिली आहे. त्यामुळे नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमा समाविष्ट केली गेली, ही अभिमानाची बाब आहे. शिवरायांची वाघनखे ब्रिटनहून भारतात परत आणण्यात आली असून ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी गर्दी करत आहेत.” (Chhatrapati Shivaji Maharaj)
किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गडकोट संवर्धनासंदर्भात भूमिका मांडली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे आपले स्फूर्तीस्थान असून त्यांचे संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी गडकोटांच्या परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक एकोपा, न्याय आणि सुशासनाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे आजच्या शिवजयंती निमित्ताने आपण त्यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करूया.”
शिवनेरीवर जल्लोष, पारंपरिक वेशातील महिलांचा पाळणा आणि पोलिसांची मानवंदना
शिवनेरीवर झालेल्या या सोहळ्यात महिलांनी पारंपरिक वेशात शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत वाजवल्यानंतर पोलिस बँड पथकाने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या धूनसह सलामी दिली. त्यानंतर पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी आणि माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.
शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याची प्रेरणा मिळते. येथील ऐतिहासिक वारसा जतन करून भविष्यात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो नागरिकांनी हजेरी लावली आणि शिवजन्मोत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


हे ही वाचा :
धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री
ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; काँग्रेसकडून तीव्र विरोध
तुमचं UPI व्यवहार अयशस्वी झाल्यास आता त्वरित रिफंड मिळणार
आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार खेळ
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पंतप्रधान मोदींनी केले आवाहन
ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती, वाचा संपुर्ण माहिती