Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न, पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ चर्चासत्र व...

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न, पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ चर्चासत्र व सहविचार सभा संपन्न

जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे प्रणेते गुरुवर्य पु. ग. वैद्य यांचे स्मरण आणि गणित अध्यापक चर्चासत्र व सहविचार सभा लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे येथे आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी सकाळी 10:30 ते 4:30 या वेळेत संपन्न झाली.

ज्येष्ठ भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन व गुरुवर्य पु.ग. वैद्य यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे नवनियुक्त अध्यक्ष देविदास शिंदे यांनी प्रास्ताविकातून संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे टॅलेंट सर्च एक्झाम बाबत सविस्तर माहिती दिली. पु.ग.वैद्य सरांचे गणिताचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी व गणित शिक्षकांपर्यंत पोहचविणे. गणित अध्यापकांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, एन एम एम एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, इतर शालेय परींक्षाबाबत विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करणे या उद्देशाने गणित अध्यापक संघाची पुनर्रचना करण्यात आल्याचे शिंदे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

भगवान पांडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रदीप ठाकर यांनी पु. ग. वैद्य सरांच्या कार्याचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेतला. यानंतर लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या प्राचार्या सौ मेधा सिन्नरकर मॅडम यांनी वैद्य सरांच्या कार्याच्या आठवणी व शिक्षक घडविण्यात सरांचे योगदान याबाबत उजाळा दिला. त्याचबरोबर लीलाधर गाजरे, महामंडळाचे कार्यवाहक शिवशरण बिराजदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी वैद्य सरांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता गणित शिक्षकांची आहे असे मत व्यक्त केले व मुख्याध्यापक संघाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, डॉ. प्रदीप आगाशे, महाराष्ट्र गणित महामंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव, गणित संशोधक लक्ष्मण गोगावले, यांनी पु. ग. वैद्य सरांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

विद्या महामंडळ संस्था पुणे चे अध्यक्ष श्रीराम रानडे यांनी अध्यक्षीय भाषणातून वैद्य सरांसोबतचे अनेक किस्से व अनुभव सांगितले. पहिल्या सत्राच्या शेवटी महामंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव यांनी पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाची पुनर्रचित कार्यकारिणी जाहीर केली व मान्यवरांच्या हस्ते महामंडळाच्या वतीने नियुक्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दुपारच्या सत्रामध्ये बालभारती पुणे येथील गणित विषयाच्या विशेष अधिकारी श्रीमती उज्ज्वला गोडबोले यांनी गणिताची सध्याची पाठ्यपुस्तके व नवीन शैक्षणिक धोरणात येणारी पुस्तके याविषयी अध्यापकांना संबोधित केले. यानंतर करिअर कौंसलर भास्कर मुसळे सरांनी जेईई व नीट या परीक्षांसाठी शालेय पातळीवर विद्यार्थ्यांची तयारी कशा पद्धतीने करून घेता येईल, या परीक्षेचे कट ऑफ याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका गणित अध्यापक संघातील अध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारणी यांना गणित महामंडळाच्या वतीने नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान पांडेकर व कल्याण कडेकर यांनी केले, तर सचिन धनवट यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, जेष्ठ गणित शिक्षक भारत काळे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, शिष्यवृत्ती तज्ज्ञ मार्गदर्शक बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अशोकराव दरेकर, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व गणित अध्यापक बंधू भगिनी बहुसंख्येने सुट्टी असूनही उपस्थित होते.

एकंदरीत आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर नियोजन व नेटका संपन्न झाला. यासाठी आपटे प्रशालेच्या प्राचार्या मेधा सिन्नरकर, देविदास शिंदे, भारत काळे, कल्याण कडेकर, संदिप लोणकर, सचिन धनवट, भगवान पांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या पुढेही अशा अनेक गणिती कार्यक्रमाचे आयोजन करूयात व ही गणित चळवळ आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे नेऊयात.

पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

1. अध्यक्ष – देविदास शिंदे
2. राज्य प्रतिनिधी – भारत काळे
3. कार्याध्यक्ष – कल्याण कडेकर
4. उपाध्यक्ष – नाना डुकरे, बिभिषण कुटे, नाना घळके, संजय पवळे.
5. सचिव – सचिन धनवट
6. सहसचिव – मनिषा नहार, मारुती मांढरे
7. खजिनदार – संदिप लोणकर
8. परीक्षा समिती – पांडूरंग आटोळे, शंकर धावणे, स्मिता रावल.
9. विद्या समिती – भगवान पांडेकर, जितेंद्र त्रिवेदी
10. विद्या समिती सचिव – योगेश माळशिरसकर
11. विद्या समिती सहसचिव – दत्तात्रय रणनवरे
12. विद्या समिती सहसचिव – भाऊसाहेब सातपुते
13. प्रसिद्धी प्रमुख – अतुल क्षिरसागर, प्रविण ताजणे

संबंधित लेख

लोकप्रिय