Sunday, January 5, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकर्तृत्वाला मेहनतीचा रंग असतो - सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर

कर्तृत्वाला मेहनतीचा रंग असतो – सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर

घोडेगाव / आनंद कांबळे : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत घोडेगाव ता.आंबेगाव येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी विशेष व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे संपन्न झाला.

यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. आदिम संस्थेच्या वतीने आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतीपर ज्ञानसरिता अभ्यासिका, घोडेगाव येथे सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, घोडेगाव परिसरातील मुले – मुली करत आहे.

आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त, अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुला – मुलींसाठी, घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांचे विशेष व्याख्यान यावेळी पार पडले.

यावेळी, त्यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी करताना, सातत्यपूर्ण अभ्यास करावा व हा अभ्यास कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याबरोबरच अभ्यास करताना कोणत्या गोष्टींचा मोह टाळावा याविषयी ही सविस्तर मार्गदर्शन केले. आपले आई – वडील व आपले गाव यांच्या ज्या अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करून यश मिळवा असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी, अभ्यासिकेत नियमित येवून अभ्यास करणाऱ्या मुला – मुलींना आदिम संस्थेच्या वतीने छोटीशी भेट देण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे यांनी अभ्यासिका, अभ्यास व ग्रंथालय यांचे महत्व नमूद केले. तर किसान सभेचे नेते व बोरघर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य राजू घोडे यांनी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या कार्याचा परिचय करून देत असतानाच आजची आव्हाने ही नमूद केली.

यावेळी, पाटण – पिंपरी ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मण मावळे, बोरघर ग्रामपंचायतचे सदस्य, दीपक वाळकोळी, एस.एफ.आय. संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, आदिवासी ठाकर संघर्ष समन्वय समितीचे अर्जुन काळे, किसान सभेचे दत्ता गिरंगे, अशोक जोशी, संदीप शेळके, साथी संस्थेचे शैलेश डीखळे, स्वप्नील व्यवहारे, रुपाली काठे इ.याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिम संस्थेचे बाळू काठे, प्रास्ताविक रीना मुंढे व आभार दिपाली वाळकोळी यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय