गेल्या काही महिन्यांपासून जगभरात भूकंपाचे सतात्याने धक्के जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आज अफगाणिस्तान आणि तजाकिस्तानमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले.
चीनच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.8 एवढी तीव्रता या भूकंपाची नोंदवली गेली. मात्र, या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही.
अफगाणिस्तानात आज पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबादपासून 265 किलोमीटर अंतरावर होता. यूएसजीएसच्या नुसार, तजाकिस्तानमध्ये सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी 6.8 तीव्रतेचा भूकंप आला. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की चीनच्या झिजियांग क्षेत्रातही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच हजारो नागरिकांनी जीवमुठीत घेऊन घरातून पलायन केलं. सुरक्षित ठिकाणी जाणं या नागरिकांनी पसंत केलं.
भूकंप अधिक शक्तीशाली होता
चीनी भूकंप नेटवर्कच्या मते हा भूकंप अधिक शक्तीशाली होता. हा भूकंप 7.2 रिश्टर स्केल एवढा होता असं सांगितलं जातं. जमिनीच्या 10 किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक एजन्सीचे प्राथमिक भूकंपीय माप वेगवेगळे असतात. त्यामुळे चीनी नेटवर्कने भूकंपाच्या तीव्रतेचा वेगळा आकडा सांगितला आहे. या आधी काल नवी दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, या भूकंपाची तीव्रता अधिक नव्हती. त्यानंतर थोड्याच वेळाने नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 5 हून अधिक होती.