Saturday, January 11, 2025
HomeNewsमहाविकास आघाडीला मोठा धक्का, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांचा भाजपमध्ये...

महाविकास आघाडीला मोठा धक्का, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.२३ – पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून, चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मिक्षपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सभा झाली. यावेळी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, रासपचे शहराध्यक्ष भारत महानवर, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा २१ फ्रेब्रुवारी रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला होता. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. आता सचिन साठे यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढली असून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय